अनुदानित महाविद्यालयं प्राचार्य संघटनेतर्फे आयोजीत राणी चन्नम्मा विद्यापीठाशी (आरसीयु) संलग्न अनुदानित महाविद्यालयांच्या सेवानिवृत्त प्राचार्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला.
अनुदानित महाविद्यालय प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष आणि एसकेई सोसायटीच्या गोविंदराम सक्सेरिया विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. नागराज हेगडे यांच्या अध्यक्षतेखाली या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे राणी चन्नम्मा विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रा रामचंद्र गौडा यांच्या हस्ते सेवानिवृत्त प्राचार्यांचा सत्कार करण्यात आला.
आपल्या समयोचित भाषणात उपकुलगुरू प्रा. रामचंद्र गौडा यांनी महाविद्यालयांच्या विकासामध्ये प्राचार्यांची भूमिका कशी असली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्यापीठाच्या सुरळीत कामकाजासाठी विशेष करून कोरोना प्रादुर्भाव काळात प्राचार्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कौतुकोद्गार काढले.
समारंभास सन्माननीय अतिथी म्हणून आरसीयुमधील स्पेशल ऑफिसर आणि संगोळ्ळी रायण्णा प्रथम दर्जा महाविद्यालयाचे प्राचार्य एम. जयाप्पा उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. एस. ओ. हलसगी, डॉ. व्ही. डी. यलमाली, प्रा. एस जी सोन्नद, डॉ. पी. आर. हिरेमठ, प्रा. एस. एस. कोदाटे आणि डॉ. जी. के. गोवेकर या प्राचार्यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला.
प्रारंभी डॉ. एन. डी. हेगडे यांनी सर्वांचे स्वागत केले तर शेवटी डॉ. एस. एन. पाटील यांनी आभार मानले. सत्कार समारंभानंतर प्राचार्य संघटनेची वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली.