बेळगांव महापालिकेसमोर अनाधिकृत ध्वज फडकावून भारताच्या राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याद्वारे राष्ट्रीय एकात्मतेचा भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित उपद्रवी लोकांवर कठोर कारवाई करावी. तसेच येत्या 31 डिसेंबरपूर्वी संबंधित लाल-पिवळा हटवावा अन्यथा 1 जानेवारी 2021 रोजी महापालिकेवर भगवा ध्वज फडकविण्यात येईल असा इशारा अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने दिला असून तशा आशयाचे निवेदन पोलीस आयुक्तांना सादर केले आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त डॉ. त्यागराजन यांना आज मंगळवारी सकाळी सादर करण्यात आले. प्रारंभी पोलीस आयुक्त म. ए. युवा समितीच्या शिष्टमंडळाला भेटण्यास टाळाटाळ करत होते. तथापि समितीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन छेडताच पोलीस आयुक्तांनी नमते घेत त्यांना चर्चेसाठी कार्यालयात बोलावले.
यावेळी झालेल्या चर्चेप्रसंगी अध्यक्ष शुभम शेळके यांनी अनाधिकृत लाल-पिवळ्या ध्वजाची माहिती आणि राष्ट्रध्वजाचे महत्त्व विशद करून महापालिकेसमोर उपद्रवी लोकांकडून फडकवण्यात आलेला अनाधिकृत लाल पिवळा ध्वज 31 डिसेंबरपूर्वी हटविण्यात यावा, अन्यथा 1 जानेवारी 2021 रोजी महापालिकेवर भगवा ध्वज फडकविण्यात येईल, असे पोलीस आयुक्तांना सांगितले.
गेल्या कांही वर्षांपासून कर्नाटक राज्यात कोणतीही अधिकृत मान्यता नसताना कांही संघटना लाल- पिवळ्या ध्वजाचा वापर करत आहेत. त्याचप्रमाणे हा ध्वज सरकारी कार्यालयांवर देखील अनधिकृत फडकत असतो. राष्ट्रध्वजासमोर असा अनाधिकृत ध्वज फडकावणे हा राष्ट्रध्वजाचा अवमान आहे. ध्वजा संदर्भातील कायद्यानुसार भारत देशात राहून दुसरा ध्वज उभारणे अथवा वापरणे आणि तो ध्वज वापरण्यासाठी नागरिकांवर दबाव आणणे, हा राष्ट्रध्वजाचा अपमान असून हा प्रकार राष्ट्रीय एकात्मता भंग करण्याचा प्रकार समजला जातो. ही वस्तुस्थिती असताना असा ध्वज कांही उपद्रवी लोकांनी काल 28 डिसेंबर रोजी बेळगांव महापालिकेसमोर पोलिसांसमक्ष फडकविला आहे. याप्रसंगी प्रारंभी पोलिसांनी लाल पिवळा ध्वज उभारण्यास मज्जाव करून आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. परंतु संबंधित लोकांनी राष्ट्रगीत म्हणण्यास प्रारंभ करून पोलिसांचा प्रयत्न हाणून पाडला. त्याचप्रमाणे पोलिसांशी अरेरावी देखील केली. या पद्धतीने राष्ट्रगीताचे गायन करणे हा राष्ट्रगीताचा अपमान आहे.
लाल-पिवळा ध्वज प्रादेशिक आयुक्त कार्यालय, रेल्वेस्थानक आदी ठिकाणी अनाधिकृतरित्या फडकविण्यात आला आहे. महापालिकेसमोर हा ध्वज फडकवणे म्हणजे राष्ट्रध्वजाचा अवमान आहे. तेंव्हा या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित उपद्रवी लोकांवर कठोर कारवाई करून राष्ट्रध्वजाचा अवमान थांबवावा, अशा आशयाचा तपशील युवा समितीने सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात अध्यक्ष शुभम शेळके यांच्यासह उपाध्यक्ष संतोष कृष्णाचे, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सेक्रेटरी श्रीकांत कदम ,माजी महापौर सरिता पाटील,उपमहापौर रेणू किल्लेकर, सागर पाटील,सुरज कणबरकर आदींचा समावेश होता.
पोलीस आयुक्तांची भेट मिळणे-निवेदन देण्याबाबत पोलीस उपायुक्त निलगार ,पोलीस अधिकारी आणि समिती नेत्यात झालेला असा हा संघर्ष पहा बेळगाव Live वर
https://www.facebook.com/375504746140458/posts/1294013990956191/
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1294011787623078&id=375504746140458