जुनाट झालेला एक इलेक्ट्रिकचा खांब आज दुपारी अचानक भर रस्त्यात कोसळल्याची घटना येळ्ळूर येथे घडली. या दुर्घटनेत कोणाला इजा झाली नसली तरी वीज वाहिन्यांसह एका मोटरसायकलचे नुकसान झाले. तसेच कांही काळ संबंधित भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.
येळ्ळूर येथील मुख्य रस्त्यांचे विकास काम करण्यात आले असले तरी या ठिकाणचे रस्त्याशेजारी असलेले कांही जुनाट इलेक्ट्रिक खांबाच्या ठिकाणी अद्याप नवे खांब उभारण्यात आलेले नाहीत. दिवसभर वर्दळीच्या असणाऱ्या या रस्त्यावरील एक जुनाट इलेक्ट्रिक खांब आज सोमवारी दुपारी अचानक कोसळून पडला.
त्यामुळे या ठिकाणच्या वीज वाहिन्यांचे नुकसान झाले. दैव बलवत्तर म्हणून एका मोटरसायकलस्वाराच्या अंगावर हा खांब कोसळला नाही. खांब कोसळत असल्याचे लक्षात येताच रस्त्यावरून निघालेला संबंधित मोटरसायकलस्वार प्रसंगावधान राखून गाडी रस्त्यावर सोडून सुरक्षित जागी धावला.
इलेक्ट्रिक खांब त्याला जोडलेल्या वीजवाहिन्यांसह रस्त्याच्या मधोमध कोसळल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कांही काळ ठप्प झाली होती. त्याप्रमाणे बराच काळ त्या भागातील वीजपुरवठाही खंडित झाला होता.
सदर घटनेची माहिती मिळताच हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे काम हाती घेतले. उपरोक्त घटनेमुळे येळ्ळूर गांवातील जुनाट इलेक्ट्रिक खांबांचा प्रश्न ऐरणीवर आला असून संबंधित खांब तात्काळ हटवून त्या ठिकाणी नवे इलेक्ट्रिक खांब उभे केले जावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.