राज्य सरकारने मराठा विकास महामंडळाची घोषणा केल्याच्या निषेधार्थ कांही कन्नड संघटनांनी शनिवार दि 5 डिसेंबर रोजी “कर्नाटक बंद” पुकारला आहे. मात्र पोलीस खात्याने बंद पुकारून नये अशी अप्रत्यक्ष सूचना देणारी नोटीस कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना पाठवल्यामुळे त्यांचा तीळपापड झाला आहे.
मराठा विकास महामंडळ स्थापनेच्या विरोधात काही संघटनांनी उद्या शनिवार दि. 5 डिसेंबर रोजी कर्नाटक बंदची हाक दिली आहे. राज्यातील अन्य कोणत्याही संघटनेचा पाठिंबा नसलेल्या या बंदच्या हाकेला राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेतलेले नाही. मराठा विकास महामंडळाच्या विरोधात बंद करणाऱ्या कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस खात्याने नोटीस बजावली आहे. परवानगीशिवाय कोणतेही पाऊल उचलल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा उल्लेख नोटिशीमध्ये करण्यात आला आहे. परवानगीशिवाय कोणत्याही मोर्चा, निदर्शने किंवा मेळावा घेता येणार नाही. बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पूर्णपणे जबाबदार धरले जाईल. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. तेंव्हा पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही पाऊल उचलू नये, असा इशारा नोटीसीद्वारे देण्यात आला आहे. या नोटीशीमुळे सध्या कन्नड संघटनांच्या म्होरक्यांचा तीळपापड होत आहे.