रहदारी पोलिसांच्या साफ दुर्लक्षामुळे सध्या शहरातील शेरी गल्ली कॉर्नर हा परिसर चार चाकी वाहनांचे जणू बेकायदा वाहनतळ अर्थात पार्किंग बनले असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे
शेरी गल्ली कॉर्नर म्हणजे पूर्वीचा गवताचा बाजार या ठिकाणच्या रस्त्यावर अलीकडच्या काळात दुतर्फा चार चाकी वाहने पार्क केली जात आहेत. रहदारी पोलिसांचा धाक नसल्यामुळे परगावाहून येणारे नागरिक आपली चार चाकी वाहने या भागात रस्त्याच्या कडेला थांबून बाजारात खरेदीसाठी जातात. चार चाकी वाहनांसाठी शहरात बापट गल्ली आणि पूर्वीच्या कपिल टॉकीज शेजारी पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे. तथापि पार्किंगमध्ये गाडी पार्क करण्याचे आणि ती बाहेर काढण्याचे श्रम वाचविण्यासाठी शेरी गल्ली परिसरात हा प्रकार होत आहे.
कांही अतिउत्साही बेजबाबदार वाहन चालक तर चक्क शेरी गल्ली मध्येच आपली वाहने पार्क करत आहेत. वाहन चालक आपल्या गाड्या लॉक करून जात असल्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना आपली वाहने घराबाहेर काढणे कठीण जात आहे. त्याप्रमाणे येथील दुकानदार व व्यापाऱ्यांना नाहक मनस्ताप होत आहे. रस्त्याकडेला दुतर्फा पार्क केलेल्या वाहनांमुळे शेरी गल्लीतून दुचाकी घेऊन येणाऱ्यांना समोरील रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांचा अंदाज लागत नाही. परिणामी याठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे.
कायद्याच्या अंमलबजावणीच्या नांवाखाली रहदारी पोलीस शहरातील वाहनचालकांना वेठीस धरत असतात. तथापि वेळोवेळी तक्रार करून देखील शेरी गल्ली कॉर्नर येथील या बेकायदा पार्किंगकडे त्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तरी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेरी गल्ली परिसरातील चार चाकी वाहनांचे बेकायदा पार्किंग थांबवावे. त्यासाठी या भागात रहदारी पोलिसाची नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.