उत्तर कर्नाटकातील आगामी बेळगांव लोकसभा पोटनिवडणूकीचे तिकीट मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका राजकीय नेता बनलेल्या शिक्षण तज्ञाची 10 कोटी रुपयांना फसवणूक करणाऱ्या युवराज नामक इसमाला बेंगलोर केंद्रीय गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पोलिसांनी काल बुधवारी गजाआड केले आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव युवराज स्वामी असे आहे. अनेकांना सरकारी नोकऱ्या, मंडळ -निगमांचे अध्यक्षपद आणि चक्क खासदारपद देखील मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या युवराज याच्या नागरभावी येथील घरातून 91 कोटी रुपये किंमतीचे 100 धनादेश जप्त करण्यात आले आहेत.
बेळगांव लोकसभा मतदारसंघातील एका राजकीय नेता बनलेल्या शिक्षण तज्ञाला आगामी बेळगांव लोकसभा पोटनिवडणुकीचे तिकीट मिळवून देतो असे सांगून युवराजने 10 कोटी रुपये उकळले असल्याची माहिती सीसीसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली. संबंधित राजकीय नेत्याने युवराजकडील पैसे परत मागितले होते. तथापि सर्व पैसे आपण राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधील विविध लोकांना दिले असल्याचे सांगून युवराजने पैसे परत करण्यास नकार दिला होता. त्यामुळे संतापलेल्या त्या राजकीय नेत्याने एका त्रयस्थ करवी युवराज विरुद्ध फसवणुकीची तक्रार नोंदवली होती.
बेंगलोर केन्द्रीय गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) सदस्य असलेल्या 55 वर्षीय युवराजला अटक केली. यासंदर्भात बेंगलोर गुन्हे शाखेचे संयुक्त पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार प्रकल्पाचे टेंडर पास करण्यासाठी घेतलेले 1 कोटी रुपये परत करण्यास युवराज स्वामीने नकार दिल्यामुळे एका व्यक्तीने पोलिसात तक्रार नोंदविली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन युवराज स्वामी याला अटक करण्यात आली आहे.