रहिवाशांची मदत आजोबांना मिळाले नवजीवन बेळगांव शहर हे कनवाळू हृदयाच्या लोकांनी भरलेले आहे, जे एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करण्यास जराही विलंब लावत नाहीत. एखाद्या व्यक्तीची अडचणीतून सुटका करण्यासाठी येथील लोक एका पायावर तयार असतात. बेळगावकरांच्या या मदत करण्याच्या वृत्तीचा प्रत्यय गेल्या 2019 सालच्या पूर परिस्थिती काळ असो किंवा कोरोना संकट काळ असो अशा अनेक बिकट प्रसंगी आला आहे.
अलीकडेच सकाळी फिरावयास जाणाऱ्या रेणुका अंकलगी याना हिंदवाडी येथे एक वृद्ध व्यक्ती झाडाखाली झोपलेली आढळून आली. प्रचंड थंडीत आदल्या दिवशी रात्री फक्त एक कचोरी खाऊन हे आजोबा पातळ चादर अंगावर ओढून झाडाखाली झोपले होते. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक महिन्यांपासून या आजोबांनी त्या झाडाखाली आसरा घेतला होता. त्यांना आसपासच्या नागरिकांकडून अन्य दिले जात होते. मात्र काहीवेळा भटकी कुत्री त्यांच्या बाजूला ठेवलेले अन्न पळवत.
या आजोबांचे नांव अशोक चेडचाळ असे असून ते देशनूर गांवचे रहिवासी आहेत. या अविवाहित आजोबांना त्यांच्या घरच्यांनी टाकले आहे. ते पूर्वी लूममध्ये कामाला होते. परंतु कालांतराने दृष्टी अंधुक झाल्याने त्यांना कामावरून कमी करण्यात आले. त्यानंतर ते अंकलगी मठात रहात होते. मात्र हा मठ देखील लॉक डाऊन काळात बंद झाला. परिणामी मदतीसाठी शहराची वाट धरण्यात व्यतिरिक्त दुसरा पर्याय आजोबांसमोर उरला नाही.
रेणुका अंकलगी यांना हे आजोबा आढळून येताच त्यांनी सामाजिक कार्य करणाऱ्या गौरी गजबर, सुलक्षणा सुतार, शितल चिलमी, वरूण कारखानीस आणि धर्मन पुरोहित यांच्याशी संपर्क साधला. तेंव्हा या सर्वांनी आजोबांना आसरा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अखेर शंकर मेलदार यांनी त्या आजोबांची संपुर्ण जबाबदारी घेऊन त्यांना खासबाग येथील निवारा केंद्रात आसरा मिळवून दिला. त्यानंतर आजोबांची हेअर कटिंग व दाढी केली गेली. आंघोळीला गरम पाणी आणि परिधान करण्यास स्वच्छ कपडे दिले गेले. त्याचप्रमाणे खास ख्रिसमसनिमित्त तयार करण्यात आलेले दुपारचे मेजवानीचे जेवण त्यांना देण्यात आले.
धर्मन पुरोहित यांनी या निवारा केंद्राला भेट देऊन तेथील महिला सदस्यांसाठी ड्रेसिंग रूम बांधण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर सायंकाळी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर काही फळे आणि जिलेबी घेऊन निवारा केंद्रात पोहोचले. साई भवन, येडियुरप्पा रोड, खासबाग येथील सदर निवारा केंद्रात सध्या 38 सदस्य आहेत. तेंव्हा बेळगावकरांनी या केंद्राला भेट देऊन आपल्यापरिने मदत करावी. तसेच यासंदर्भात अधिक माहितीसाठी 8147702050 या मो. क्रमांकावर शंकर मेलदार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सौजन्य: मंदार कोल्हापुरे