राज्यभरात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता.
त्यामुळे शुक्रवारी दिवसभर इच्छुकांची अर्ज भरण्यासाठी लगबग तर सुरु होतीच त्यासोबतच कर्मचाऱ्यांची तारांबळ सुरू होती. जितक्या जागांसाठी निवडणूक लढविल्या जात आहेत त्यापेक्षा तिप्पट क्रमांकात इच्छुकांचे अर्ज दाखल झाले आहेत. बेळगाव तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती.
परंतु मच्छे आणि पिरनवाडी ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने येथील निवडणूक रद्द करण्यात आली आहे. तर बीजगर्णी आणि बेळवट्टी ग्रामपंचायती येत्या सहा महिन्यानंतर नगरपंचायतींमध्ये वर्गीकृत करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता एकूण ५५ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे.
बेळगाव तालुक्यातील समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येळ्ळूर विभागात ३० जागांसाठी तब्बल ९४ अर्ज दाखल झाले आहेत. तर संपूर्ण बेळगाव तालुक्यात एकूण जागांपैकी उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी असलेल्या मुदतीमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ग्रामपंचायतींच्या समोर गर्दी केली होती. दुसर्या बाजूला अधिकारी वर्गाने अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत कामकाज सुरू ठेवले होते. उमेदवारांनी दिलेले अर्ज आणि कागदपत्रे यांची तपासणी करून उमेदवारांचे अर्ज दाखल करून घेण्यात आले. अर्जांची छाननी आणि अर्ज माघारीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. यानंतर एकंदर चित्र स्पष्ट होईल.
निवडणुकीसाठी तालुक्यात लगबग सुरू झाली असून ग्रामपंचायतींवर आपला झेंडा रोवण्यासाठी इच्छुकांनी जोरदार कंबर कसली आहे. निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी तरुणांची संख्या अधिक असल्याचे निदर्शनास आले असून नवी राजकीय समीकरणे पुढे येण्याची शक्यता आहे. अंतिम अर्जाची छाननी आणि माघारीची प्रक्रिया पार पडल्यानंतर इच्छुक उमेदवारांच्या अंतिम यादीचे चित्र स्पष्ट होणार आहे.