Sunday, January 26, 2025

/

निःपक्ष म्हणवून घेणाऱ्या पक्षाच्या फलकांवर मराठीसाठी जागा नाही

 belgaum

स्वतःच्या पक्षाला निःपक्ष म्हणवून घेणाऱ्या भाजपच्या धोरणात निःपक्षपातीपणाचा अभाव जाणवतो. याबाबतीत अनेकांनी भाजपच्या या पक्ष धोरणावर सडकून टीका केली आहे. त्याचा प्रत्यय सध्या बेळगावमधील मराठी भाषिकांना येत आहे. बेळगांव शहरात येत्या शनिवारी राज्य भाजप कार्यकारिणीची बैठक होणार असून या बैठकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. या बैठकीच्या प्रसिद्धीसाठी सर्वत्र लावण्यात येत असलेल्या फलकांवर मराठी भाषेचा लवलेशही दिसून येत नसल्यामुळे भाजप प्रणित मराठी भाषिक नेते व समर्थकांमध्ये तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.

राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि. 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:30 वाजता राज्य भाजप कोर कमिटीची बैठक बेळगावमध्ये आयोजित करण्यात आली आहे. शनिवार 5 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य भाजप कार्यकारिणीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या दोन्ही महत्त्वपूर्ण बैठकांच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर आणि जिल्हा भाजपतर्फे बेळगांवात येणाऱ्या भाजप नेत्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली जात आहे. यासाठी शहरात ठिकठिकाणी, अनेक मोक्याच्या जागी जाहिरात फलक उभारले जात आहेत. बेळगाव जिल्ह्यात विशेषतः बेळगाव शहर आणि तालुक्यामधील बहुसंख्य मराठी भाषिक महाराष्ट्र एकीकरण समितीनंतर प्राधान्याने भाजपचे समर्थक आहेत.

ही वस्तुस्थिती असताना याकडे दुर्लक्ष करून स्थानिक नेत्यांनी केवळ कन्नड भाषेतच संबंधित जाहिरात फलक उभारले आहेत. सीमाभागातील मराठीविरोधी कार्य करणारे अनेक कार्यकर्ते आणि संघटना आहेतच. परंतु याच कार्यकर्त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना मराठी मतांचा जोगवा मागूनच विजयी व्हावे, लागते, याचे भान या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना नसावे, याचा प्रत्यय पुन्हा पुन्हा सीमाभागात येत आहे.

 belgaum

या पद्धतीने बहुसंख्येने भाजपचे समर्थक असणाऱ्या मराठी लोकांना गृहीत न धरता सर्वत्र कन्नड भाषेतील फलक लावण्यात येत असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष निःपक्षपाती आहे, यावर विश्वास असणाऱ्या मराठी भाषिक नेतेमंडळींकडून किमान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरी कन्नड-मराठी हा भेदभाव न करता भाजपने संबंधित जाहिरात फलकांमध्ये मराठीला देखील प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.