फॉर्ब्सच्या सर्वात गर्भश्रीमंत भारतीयांच्या यादीत 90 व्या स्थानावर असणारे बेळगांवचे जावई झेरोदा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नितीन कामत यांनी नुकतीच बेळगांवला धावती भेट दिली.
गोव्याला जाताना नितीन कामत हे बेळगांवातील आपले घनिष्ट मित्र अल्पेश जैन यांच्या निवासस्थानी अल्प विश्रांतीसाठी थांबले होते. भारतातील पहिल्या ऑनलाईन व्यापार मंच असलेल्या झेरोदा कंपनीचे सीईओ असणारे नितीन कामत यांची मालमत्ता तब्बल 1.2 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
त्याचप्रमाणे नितीन आणि त्यांचे बंधू निखिल या उभयतांची मालमत्ता सुमारे 24 हजार कोटींची आहे. विशेष म्हणजे नितीन कामत यांनी बेळगांवच्या मुलीशी लग्न केले आहे.
नितीन आणि त्यांचा लहान भाऊ निखिल यांनी 2010 साली झेरोदा कंपनी सुरू केली. बेंगलोर येथे मारवाडी मित्रांमध्ये लहानाचे मोठे झाल्यामुळे नितीन यांना रोखेबाजार आणि व्यापार यांची भुरळ पडली. परिणामी फार लवकर म्हणजे कॉलेजमध्ये असताना वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी व्यापार सुरू केला आणि “आपल्याला हेच करायचे होते” हे तेंव्हा त्यांना समजले.
नितीन यांच्यापेक्षा 7 वर्षांनी लहान असणाऱ्या निखिल यांनी दहावी उत्तीर्ण होताच भावाला मदत करायला सुरुवात केली. झेरोदा कंपनी सुरू करण्यापूर्वी नितीन कामत यांनी बीपीओ आणि फायनान्स कंपनीत काम केले.
नितीन कामत यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता, परंतु त्याच कालावधीत व्यापाराचा व्याप वाढल्यामुळे त्यांनी कॉलेज अर्धवट सोडले. हे दोन्ही कामत बंधू एका पारंपारिक कुटुंबातून आले जेथे फक्त शिक्षणाला महत्त्व होते. या कुटुंबाचा व्यापाऱ्याशी काडीचाही संबंध नव्हता, तथापि नितीन आणि निखिल यांनी स्वकौशल्य आणि अंतःप्रेरणेने झेरोदा या अद्वितीय कंपनीची उभारणी केली. बाजारपेठेत उलथापालथ घडविणारी ही कंपनी ग्राहकांच्या प्रत्येक व्यापारासाठी सरसकट 20 रुपये दर आकारणी करते.
प्रारंभीच्या काळात फक्त 10 हजार ग्राहक असणाऱ्या झेरोदाचे आजच्या घडीला जगभरात 4 दशलक्ष ग्राहक आहेत. कंपनीने तंत्रज्ञान क्षेत्रात देखील गुंतवणूक केली आहे. इतर संस्था व्यापाराच्या किंमतीप्रमाणे शुल्क आकारणी करतात. तथापि झेरोदा ही कंपनी आपल्या सर्व 4 दशलक्ष ग्राहकांना सरसकट समान शुल्क आकारते हे विशेष होय.
फॉर्ब्स आणि इकॉनॉमिक टाईम्स सारख्या जगप्रसिद्ध मासिकात झळकलेल्या गर्भश्रीमंत नितीन कामत यांचे राहणीमान इतके साधे आहे की जर ते खडेबाजार किंवा मारुती गल्लीत गेले तर कोणालाही वाटणार नाही की ते अब्जाधीश आहेत. यशाचा आपल्या नैतिक मूलभूत मूल्यांवर परिणाम होऊ न देता व्यवसायावर लक्ष केंद्रित करणे हे यामागचे कारण असावे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
सौजन्य- मूळ इंग्लिश आर्टिकल -स्वाती जोग