एकेकाळी पाचवरून शून्य विमान सेवेवर आलेले बेळगांव विमानतळ आता नवनव्या हवाईमार्गांसह वाढत्या विमान संख्येच्या स्वरूपात दिवसेंदिवस नवे उंच शिखर गाठत आहे. गेल्या फेब्रुवारी 2020 मधील 752 विमान फेऱ्यांना मागे टाकत नोव्हेंबर 2020 मध्ये या विमानतळावरून 767 विमान फेऱ्या झाल्या असून ही संख्या आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.
उडान योजना खऱ्या अर्थाने बेळगांव विमानतळाला संजीवनी देणारी ठरली असून हे विमानतळ विमान फेर्या आणि प्रवासी संख्येच्या बाबतीत इतरांपेक्षा उजवे ठरले आहे. बेळगांव विमानतळाची एकच कमतरता आहे ती म्हणजे एअरबस अथवा बोईंग सारखी मोठी विमाने या ठिकाणाहून उड्डाण घेत नाहीत.
अन्यथा बेळगांव उत्तर कर्नाटकातील सर्वाधिक संपर्काचे केंद्र होण्याबरोबरच एक व्यस्त शहर झाले असते. तथापि बेंगळूर आणि मंगळूरनंतर बेळगांव विमानतळ हे राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त विमानतळ आहे. यासाठी बेळगाववासियांचे प्रयत्न आणि योगदान कारणीभूत आहे. या विमानतळाची प्रगती पाहता भविष्यात येथून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
सध्या बेळगांव विमानतळावरून बेंगलोरची विमान सेवा सुरू आहे. याखेरीज हैदराबादसाठी 3 मुंबईसाठी 2 आणि पुणे, इंदोर, सुरत, कडप्पा, तिरुपती, म्हैसूर, अहमदाबाद आणि चेन्नई (म्हैसूर मार्गे) या ठिकाणी प्रत्येकी 1 विमानसेवा सुरू आहे. त्यामुळे बेळगांव विमानतळावरून दररोज सरासरी सुमारे 25 विमान फेऱ्या होत असतात.
यापूर्वीच स्टार एअर कंपनीकडून त्यांचे एक विमान वस्तीसाठी या विमानतळावर रात्रीच्यावेळी पार्क केले जात आहे. आता या महिन्यात त्यांचे दुसरे विमान देखील या ठिकाणी पार्क केले जाणार आहे.