महापालिकेकडून शास्त्रीनगर व न्यूगुडशेडरोड परिसरातील नाल्याच्या सफाईचे काम हाती घेण्यात आल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे सदर नाल्याच्या भिंतीचे अर्धवट अवस्थेत असलेले बांधकाम लवकरात लवकर पूर्ण केले जावे अशी मागणीही केली जात आहे.
शास्त्रीनगर व न्यूगुडशेडरोड परिसरातील नागरिकांच्या पाठपुराव्यामुळे बऱ्याच दिवसाच्या प्रतिक्षेनंतर लेंडी नाल्याची सफाई पावसाळ्यापुर्वी होत असली तरी ती पूर्णत्वाला नेणे गरजेचे आहे. हा लेंडी नाला बांधताना सुद्धा फार समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी परिसरातील नागरिकांच्या इशाऱ्याकडे लक्ष न देता भौगोलिकदृष्टया अनभिज्ञ असलेल्या कंत्राटदाराकडून या न्यायालयाचे बांधकाम झाले. परिणामी कंत्राटदाराच्या चुकीमुळे आता दरवर्षी नाल्याचे पाणी आजूबाजूच्या घरांमध्ये जाऊन बरेचसे नुकसान होत होते. तेंव्हापासून नाल्यात पडलेल्या कचऱ्यात दरवर्षी भर पडत गेली. यंदा तांत्रिक अडचणीमुळे नाल्यातील कचरा काढण्यास विलंब झाल्याने डासांची भरपूर उत्पत्ती होत आहे. मागील महिन्यात येथील कांही लोकांना डेंग्युची लागणही झाली होती.
स्थानिक नागरिकांना भोगाव्या लागणाऱ्या या परिस्थितीची जाणीव जनतेतर्फे राहुल पाटील यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या नजरेला आणून दिली. तेंव्हा बेळगांव महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे आदिल खान यांच्या नेतृत्वाखाली, आरोग्य विभागाचे विजय जाधव, ईसय्या मुकादम, अकबर काझी व कुमार ड्रायव्हर यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कर्मचाऱ्यांनी शास्त्रीनगर व न्यूगुडशेडरोडमधील नाल्याची सफाईचे काम हाती घेतले आहे. यासाठी माई पाटील, नारायण माळवदे, महेश बामणे, पवन जुवेकर, बल्लू निलजकर, भूपेंद्र पटेल, विश्वनाथ गावडे, हेमंत पाटील, राजू कदम, राजू बड्डे, रवी बड्डे, विनायक गुरव, राहुल बड्डे, सुरेश मळीक, अविनाश मळीक, जोतिबा चौगुले, संजय पाटील, मधुकर सापळे, सोमाप्पा हगरण्णवर व बी. बी. गोरल या सगळ्या नागरिकांचे सहकार्य मनपा कर्मचाऱ्यांना लाभत आहे.
सदर नाल्याच्या भिंतीचे बांधकाम अद्यापही अर्धवट अवस्थेत असल्यामुळे या परिसरावर पुराची भिती कायम आहे. तेंव्हा संबंधित विभागाच्या व स्मार्टसीटीच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिकता दाखवत शहरातल्या मध्यवर्ती असलेल्या या नाल्याच्या भिंतीचे काम लवकरात लवकर यावर्षी तरी पूर्ण करून येथील समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांनी केले आहे.