Wednesday, December 18, 2024

/

सार्वजनिक वाचनालयासंदर्भात महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन

 belgaum

सार्वजनिक वाचनालयासंदर्भात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आनंद मेणसे, नागेश सातेरी,  जाधव, कृष्णा शहापूरकर, प्रकाश मरगाळे, शुभम शेळके, गुणवंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत उपस्थितांचे स्वागत कृष्णा शहापूरकर यांनी केले. तर प्रास्ताविक आनंद मेणसे यांनी केले. प्रा. आनंद मेणसे यांनी प्रास्ताविकात सार्वजनिक वाचनालयासंबंधित पुढे आलेल्या वादासंबंधी माहिती दिली. तसेच बेजबाबदारपणे आणि बेकायदेशीर रित्या स्थापन करण्यात आलेल्या संचालक मंडळाविषयी माहिती दिली. बंद खोलीत वाचनालयाच्या घटनेला हरताळ फासून संचालक मंडळाची निवड करण्यात आली असल्याचा आरोप आनंद मेणसे यांनी केला.

या सभेला उपस्थित असणाऱ्या सभासदांनीही घडलेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. आपण वाचनालयाचे स्थापनेपासून सभासद असून संचालक मंडळाची नेमणूक करण्यात आल्याची नोटीस आपल्याला मिळाली नाही. किंवा सूचनाही मिळाली नाही. त्यामुळे ही निवड बेकायदेशीर असल्याचे मत उपस्थित ज्येष्ठ सभासदांकडून व्यक्त करण्यात आले.Meeting vachanalaya

व्यासपीठावर उपस्थित असलेले गुणवंत पाटील यावेळी म्हणाले, की सार्वजनिक वाचनालय हे पुरोगामी विचारसरणीचे आहे. गेली १७४ वर्षे वाचकांसाठी असणारे हे व्यासपीठ बेळगावकरांचे मानबिंदू आहे. या व्यासपीठाचे खच्चीकरण करणे आणि वाचनालय चुकीच्या माणसाच्या हातात जाणे, ही बेळगावकरांसाठी भूषणावह बाब नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक या वाचनालयासंदर्भात चौकशी करतात. वाचनालयासंदर्भात घडलेल्या या गोष्टीचा महाराष्ट्रासह इतर अनेक साहित्यिकांनी निषेध व्यक्त केला असून वाचनालयाने दिलेले पुरस्कार परत करण्याची तयारी दर्शविली आहे. बेळगावमधील साहित्य क्षेत्रासाठी ही बाब मारक ठरणारी असेल, असे मत गुणवंत पाटील यांनी व्यक्त केले.

युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके बोलताना म्हणाले, की बेळगावच्या वैभवशाली परंपरेचे प्रतीक असणारे सार्वजनिक वाचनालय दुसऱ्या कोणाच्याही हातात जाऊ नये यासाठी युवा समिती शर्थीचे प्रयत्न करणार आहे. या वादाची दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी चर्चा करण्यात आली असता, डाव्या विचारसरणीच्या लोकांमुळे त्यांना बाजूला सरण्यात आल्याची माहिती मिळाली. परंतु हे वाचनालय साहित्य आणि वाचन या गोष्टींशी निगडित असून डाव्या किंवा उजव्या विचारसरणीचा याठिकाणी कोणताही संबंध नाही. त्यामुळे वास्तववादी विचार ठेऊन वाचनालय योग्य पदाधिकाऱ्यांच्या हाती यावे, इतकीच अपेक्षा ठेऊन यासाठी युवा समिती प्रयत्नशील राहील, असे शुभम शेळके म्हणाले.

यावेळी प्रकाश मरगाळे म्हणाले की, मी ही वाचनालयाचा सभासद आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीबाबत कोणतीही नोटीस मला मिळाली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व सभासदांना नोटीस पाठवून रीतसर निवडणूक घेऊन नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात यावी, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. बेकायदेशीर रित्या निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येणार आहे. या चर्चेत तोडगा निघाला नाही, तर कायदेशीर आणि तीव्र लढा उभारण्यात येईल, असा इशारा मरगाळे यांनी दिला.

व्यासपीठावरून बोलताना नागेश सातेरी म्हणाले की, आमची इच्छा नसूनही न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागले आणि मराठी माणसाचा मानबिंदू असणाऱ्या सार्वजनिक वाचनालयावर प्रशासकीय यंत्रणेचा हस्तक्षेप झाला, तर यासाठी आम्ही जबाबदार नसेन. न्यायालयीन प्रक्रियेनंतर बेकायदेशीर रित्या निवड करण्यात आलेल्या संचालकांना घरचा रस्ता दाखवण्यात येईल, असे नागेश सातेरी म्हणाले.

या सभेला ज्येष्ठ सभासद, वाचनालयाचे पूर्वपदाधिकारी, मराठी नेतेमंडळी आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.