परिवहन कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप तिसऱ्या दिवशीही कायम आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकावर बस थांबून आहेत, आणि संपूर्ण शहरातील बससेवा ठप्प झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून रात्रंदिवस सुरु असलेला परिवहन कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही यशस्वीरीत्या सुरु असून संपूर्ण बसस्थानकात आज सन्नाटा पसरलेला दिसून आला. परिणामी परगावी प्रावास करणाऱ्या नागरिकांचे मात्र हाल झाले. हा संप अजून किती दिवस चालणार आहे, याची शाश्वती नागरिकांना राहिली नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी खाजगी वाहनांचा पर्याय अवलंबिला आहे.
मध्यवर्ती बसस्थानकावर सुरु असलेल्या परिवहन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आता कर्मचाऱ्यांसहित त्यांच्या कुटुंबीयांनीही रविवारी साभार घेतला आहे. एकीकडे जोरदार आंदोलन छेडण्यात आले आहे तर दुसरीकडे प्रवाशांचे हाल होत आहेत. महाराष्ट्र तसेच हुबळी – धारवाड येथे प्रवास करणाऱ्या नागरिकांनी चक्क लॉरीच्या साहाय्याने परगावी पोचण्यासाठी मार्ग निवडला आहे.
महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना थांबवून अनेक प्रवाशांनी आपली सोय करून घेतल्याचे निदर्शनास आले. त्यासोबतच गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांनी खानापूर मार्गावर गर्दी केल्याचेही आढळून आले.
बेळगावमधील आजूबाजूच्या परिसरात पोहोचण्यासाठी अशोक सर्कल पासून काहीजणांनी मॅक्सीकॅबची मदत घेतली. दरम्यान बससेवा ठप्प असल्यामुळे टमटम, टेम्पो आणि ऑटो रिक्षांची वर्दळ अधिक जाणवत होती.