रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या बेळगावच्या खासदारपदासाठी इच्छुकांची मोठी रांग लागली आहे. भाजपाच्यावतीने अनेक दिग्गज नेत्यांची नावे समोर आल्याची चर्चा रंगत असतानाच भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना या निवडणुकीसाठी उभे राहण्याची सूचना केल्याची विश्वसनीय माहिती उपलब्ध झाली आहे. या वृत्तानंतर भाजपच्या वतीने लोकसभेचा उमेदवार कोण? या प्रश्नावर पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच ही निवडणूक शेट्टर यांनी जिंकली तर त्यांना केंद्रात मंत्रिपद देण्याची ‘ऑफर’ आली असल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे.
रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते होते. कार्यकर्त्यापासून खासदारकीपर्यंतचा टप्पा त्यांनी भाजपमध्येच राहून पार केला. त्यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर बेळगावमध्ये त्यांच्याच कुटुंबियांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात येत होती. जगदीश शेट्टर हे सुरेश अंगडी यांचे निकटवर्तीय आहेत.
परंतु भाजपमध्ये अनेक इच्छुकांची रांग या निवडणुकीसाठी लागलेली दिसून आली. खुद्द माजी मुख्यमंत्री असलेले जगदीश शेट्टर यांचे नावही चर्चेत येऊ लागले. यासंदर्भात नुकत्याच बेळगावमध्ये भाजप कार्यकारिणी बैठकीसाठी आलेल्या जगदीश शेट्टर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले परंतु त्यांनी या प्रश्नांना त्यांनी योग्य उत्तर दिले नाही. उलट माझे नाव कसे काय चर्चेत आले? यासंदर्भात त्यांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केले. परंतु आता केंद्रीय नेत्यांनीच जगदीश शेट्टर यांचे नाव पुढे आणले असल्याची माहिती समोर आली आहे.
जगदीश शेट्टर हे लिंगायत समाजाचे असून त्यांनी मुख्यमंत्रीपद ही उपभोगले आहे. पक्षाच्यावतीने त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. आता केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना स्थान देण्यासाठी या निवडणुक रिंगणात त्यांना उतरविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपसोबत काँग्रेसमधून केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांचे नाव पुढे आले असून सतीश जारकीहोळी विरुद्ध जगदीश शेट्टर असा सामना या लोकसभा पोटनिवडणुकीत पहायला मिळण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या भाजप कार्यकारिणी बैठकीत वरिष्ठ नेत्यांची जगदीश शेट्टर यांना उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा झाल्याचेही वृत्त हाती आले आहे. सुरेश अंगडी यांचे निकटवर्तीय म्हणून शेट्टर यांना उमेदवारी देण्यात येईल? कि भाजपमधील एक जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून उमेदवारी देण्यात येईल? कि शेट्टर यांचे नाव मागे टाकून अंतिम क्षणी दुसऱ्याच उमेदवाराचे नाव घोषित केले जाईल? हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. तोपर्यंत शक्या -शक्यतांचा खेळ जनतेसाठी रंजक असा ठरणार आहे.