बेळगांवच्या इशा शर्मा या युवा रेसर खेळाडूने नुकत्याच झालेल्या दुबई वर्ल्ड इंड्युरन्स चॅम्पियनशिप -2020 या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावून बेळगांवच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
बेळगांवात लहानाची मोठी झालेल्या ईशा शर्माने बीबीए तसेच फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. “मिस बेळगाव -2006” हा किताब मिळवणाऱ्या ईशाला रेसिंग अर्थात शर्यतीची आवड असून ही आवड तिने जोपासली आहे.
दुबई येथे भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघातील ती एकमेव मुलगी आहे. गेले 2019 सालं हे तिचे गो कार्टिंग शर्यतीत भाग घेण्याचे पहिले वर्ष होते आणि या वर्षात अनेक शर्यतीत तिने बक्षिसे मिळवली. त्यानंतर आता तिला दुबईच्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली.
कोरोना प्रादुर्भावामुळे तिला या स्पर्धेच्या पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये सहभागी होता आले नाही. परंतु कोणत्याही परिस्थितीत चौथ्या फेरीत भाग घेण्याचा तिने निर्धार केला होता. दुबई येथील स्पर्धेसाठी भारताने 11 वर्षात पहिल्यांदा आठ जणांचा संघ धाडला होता. त्यामध्ये ईशा ही एकमेव मुलगी होती. जगातील 22 देशांचा सहभाग असणाऱ्या या स्पर्धेतील सहभागाचा अनुभव तिच्यासाठी वेगळा होता. दुबई वर्ल्ड इंड्युरन्स चॅम्पियनशिप -2020 स्पर्धेत भारतीय संघाने दोन विजेतीपदे मिळविली.
या स्पर्धेतील कामगिरीमुळे ईशा शर्मा हिची पुढील वर्षासाठी भारतीय मुलींच्या संघाची कर्णधार म्हणून निवड झाली आहे. गो कार्टिंगमध्ये सहभागी होणाऱ्या ईशा शर्मा हिची यापूर्वी 6 आघाडीच्या शर्यतपटूंमध्ये निवड झाली असून रेडबुल कार्ट रेसिंगमधील आघाडीच्या तीन शर्यतपटूंमध्ये तिची गणना केली जाते हे विशेष होय.