झाडशहापूर येथील घरात चोरी करताना पकडण्यात आलेले आरोपी हे आंतरराज्य पातळीवरील अट्टल चोर असल्याचे समोर आले असून त्यांच्याकडून जवळपास लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच एक चारचाकी वाहन आणि देशी पिस्तूल जप्त करण्यात आली आहे.
प्रकाश विनायक पाटील (वय ३०, रा. सरस्वती नगर, शहापूर, बेळगाव, सध्या राहणार साखळीम गोवा), आणि नित्य खालीपद मंडल (वय ४१, रा. कालीतला, ता. जि. एन. २४ परगानस राज्य : वेस्ट बेंगॉल) अशा दोन अट्टल चोरांना अटक करण्यात आले आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक १४५/२०२० यावर कलम ४५४, ३८०, ५११ आयपीसी अंतर्गत आरोपींवर प्रकरण दाखल करण्यात आले असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. सदर आरोपींना ८ डिसेंबर रोजी पोलिसांनी अटक केली होती.
त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊन आणि तपास अधिक तीव्र गतीने करत बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत तसेच बेळगाव शहराच्या हद्दीतील एपीएमसी, कॅम्प, मारिहाळ, माळमारुती पोलीस स्थानकाच्या परिसरात या चोरांनी अनेक घरफोडी आणि चोरीचे प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे.
दरम्यान शहर पोलीस आयुक्त, पोलीस उपयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था), आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे आणि रहदारी) तसेच सहायक पोलीस आयुक्त जी. वाय. गुडाजी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर सुनीलकुमार नंदेश्वर यांच्या नेतृत्वाखाली आनंद अदगोंड, बी. ए. चौगले, वाय. वाय. तळेवाड, सी. एम. हूणच्याळ, एम. एस. गाडवी, एन. एम. चिप्पलकट्टी, जी. वाय. पुजार, एस. एम. लोकुरे यांच्यासह इतर सहकाऱ्यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.
सदर आरोपींकडून रुपये ८ लाख किमतीची ह्युंडाई क्रेटा, (वाहन क्रमांक : जीए ०६ इ २८६९), गुन्ह्यात वापरण्यात आलेले साहित्य, रुपये ६०००० किमतीची देशी पिस्तूलसह ५ जिवंत काडतुसे आणि ८४८ ग्राम वजनाचे रुपये ४२,४०,००० किमतीचे सोन्याचे दागिने, असे एकूण ५१,६०,००० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.