हलगा- अलारवाड क्षेत्रात शेतजमिनीसंबंधी अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. न्यायालयाचा आदेश येईपर्यंत हे कामकाज थांबविण्याची सूचना न्यायालयाने केली होती. परंतु न्यायालयाचा आदेश डावलून हलगा- अलारवाड क्षेत्रात पुन्हा घिसाडघाईने अनधिकृत बांधकाम करण्यात येत आहे.
याविरोधात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत आणि हलगा- अलारवाड क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले.
हलगा आणि अलारवाड क्षेत्रांमधील शेतजमिनीवर अनधिकृतपणे काही प्रकल्पांची बांधकामे उभी करण्यात येत आहेत. हा प्रकार रोखावा अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीही या प्रकरणी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु गिरीश कर्नाड यांच्या निधनामुळे हि बैठक पुढे ढकलण्यात आली होती.
त्यानंतर कोरोनापर्वामुळे आजतागायत हलगा – आलारवाड प्रकरणी बैठक घेण्यात आली नाही. याठिकाणी अनधिकृतपणे सुरु असलेले कामकाज पुढील न्यायालयीन सुनावणीपर्यंत बंद करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
हलगा आणि अलारवाड येथील प्रकल्पांच्या विरोधात न्यायालयात धाव घेऊन शेतकऱ्यांनी स्थगिती आदेश मिळविला आहे . त्याचप्रमाणे या प्रकारातील गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत. असे असताना पुन्हा पुन्हा या ठिकाणी प्रकल्प कार्यवाहीची घिसाड घाई कशासाठी? असा प्रश्न विचारला जात आहे. याप्रकरणी उपस्थित शेतकऱ्यांना बैठक घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
हे निवेदन सादर करताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील जाधव, दीपक किल्लेकर, सुनील खनुकर यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.