कर्नाटकाचे पोलीस दल संपूर्ण देशातील अत्यंत शिस्तबद्ध असे सर्वोत्तम पोलीस दल आहे, असे गौरवोद्गार राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज आज कर्नाटक राज्य राखीव पोलिस दलाच्या दीक्षांत समारंभाप्रसंगी काढले.
कर्नाटक राज्य राखीव पोलिस दलाच्या सहाव्या तुकडीचा दीक्षान्त समारंभ व पथसंचलन आज सकाळी शहरातील एपीएमसी रोडवरील केएसआरपी मैदानावर दिमाखात पार पडले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने गृहमंत्री बोम्मई बोलत होते. प्रशिक्षणार्थी पोलिसांना उद्देशून बोलताना कर्नाटकातील पोलीस दल संपूर्ण देशातील अत्यंत शिस्तबद्ध पोलीस झाला आहे.
अशा पोलीस दलाचे तुम्ही एक भाग बनवत आहात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन असे बोम्मई पुढे म्हणाले. तुम्हाला देण्यात आलेल्या या खाकी गणवेशाचा गौरव वाढवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे तुम्ही सर्वांनी अत्यंत दक्षतेने आपले कर्तव्य बजावले पाहिजे तसेच कोणत्याही कारणाने आपल्याकडून समाजावर अन्याय होणार नाही याचीदेखील काळजी घ्या असे सांगून गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलिसांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या के एस आर पी च्या सहाव्या तुकडीतील पोलिसांनी वाद्यवृंदाच्या तालावर प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. त्यानंतर प्रमुख पाहुणे गृहमंत्री बोम्मई यांनी खुल्या जीपमधून परेडची पाहणी केली. आजच्या या दीक्षांत समारंभातद्वारे 187 प्रशिक्षणार्थी राखीव पोलीस दलात रुजू झाले आहेत. या पोलिस जवानांपैकी 82 जण पदवीधर, 7 जण स्नातकोत्तर पदवीधर आणि 13 जण इंजिनीअरिंग पदवीधर आहेत हे विशेष होय. एक वर्षाच्या खडतर प्रशिक्षण कालावधीमध्ये या सर्वांना शारीरिक कवायत, शस्त्ररहित आणि शस्त्रसहित कवायत, आधुनिक शस्त्रांची हाताळणी, लाठी कवायत, अश्रुधूर नळकांड्याचा वापर, जमाव नियंत्रण, निशस्त्र लढाईसह आपत्ती निवारण, अग्निशमन आदी प्रशिक्षणे देण्यात आली आहेत
आजच्या दीक्षांत समारंभाप्रसंगी बेळगांव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके, केएसआरपी एडीजीपी आलोक कुमार, केएसआरपी प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रमेश बोरगांवे, बेळगावचे पोलीस आयुक्त के. त्यागराजन, एएसपी लक्ष्मण निंबरगी, केएसआरपी कमांडंट हमजा हुसेन आदींसह अन्य वरिष्ठ अधिकारी आणि निमंत्रित उपस्थित होते.