बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्यातील वाद हा जनतेसाठी नवा नाही. सातत्याने एकमेकांविरोधात नवनवी विधाने करून जनतेसाठी नवा चर्चेचा विषय या वादातून मिळत असतो.
आता पुन्हा एकदा जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी लक्ष्मी हेब्बाळकरांबाबतीत नवे वक्तव्य केले असून प्रसारमाध्यमांशी बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर या मोठ्या नेत्या नसल्याचं म्हटलं आहे. वरिष्ठ ज्यापद्धतीने सांगतात तितक्या मोठ्या लक्ष्मी हेब्बाळकर नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर टीका करणं आणि कोणतंही वक्तव्य करणं मी सोडून दिलं आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
लक्ष्मी हेब्बाळकर या लहान मुलीप्रमाणे असून प्रत्येक वेळी त्यांच्याबाबतीत विधाने करण्यापेक्षा आगामी निवडणुकीमध्ये शक्ती लावून काम करू. वरिष्ठ नेत्यांच्या म्हणण्यानुसार लक्ष्मी हेब्बाळकर या मोठ्या नेत्या आहेत. परंतु त्या एवढ्याही मोठ्या नेत्या नाहीत, यामुळे त्यांच्याबाबतीत वक्तव्य करणं आपण सोडून दिलं असल्याचं त्यांनी म्हटलं.
भाजपकडून ग्रामीण भागात कॅलेंडरचे वाटप करण्यात आले आहे. यासंदर्भात पत्रकारांनी यामागील हेतू काय आहे याची विचारणा केली. यावेळी उत्तर देताना जारकीहोळी म्हणाले कि, ग्रामीण मतदारसंघाचा विकास करण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे. कॅलेंडर वितरणामागे विशेष असा कोणताही हेतू नाही. शिवाय येत्या निवडणुकीत भाजप ग्रामीण मतदार संघात निवडणूक लढविणार आहे. विकास हवा असेल तर मतदार विजयी नक्की करतील.
तो सर्वस्वी मतदारांचा निर्णय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ही एकंदर परिस्थिती पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत लक्ष्मी हेब्बाळकरांना पराभूत करण्याचा तसेच आगामी निवडणुकीत भाजपचा उमेदवार ग्रामीण मतदार संघातून निवडून आणण्याचा प्रण जारकीहोळी यांनी घेतलेला दिसून येतो.