नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मराठी भाषिकांनी समितीला निवडणूक देण्याचे ठरविले.सध्या मध्यवर्ती आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती थंड झाली असून तालुकाभागात मराठी मतदारांनी जागरूकता दाखवून प्रत्येक ग्रामपंचायतीवर मराठी भाषिकांची आणि प्रामुख्याने महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केले.
सीमाभागात समितीची सत्ता गेल्यापासून समिती नेते तडीपार झाले आहेत. सीमाभागातील मराठी भाषिक जनतेचा कुणीही वाली उरला नाही. याचा गांभीर्याने विचार मराठी नेत्यांनी करणे गरजेचे होते. परंतु सत्तापिपासू नेत्यांनी स्वहित जपत जनतेला मात्र दूर लोटले. परंतु सीमाभागातील जनतेने स्वतः निर्धार करून या ग्रामपंचायत निवडणुकीत स्वतःहून महाराष्ट्र एकीकरण समितीला उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे लोक अनेक वार्डात मराठी भाषिक दोन पेक्षा अधिक जण लढत असताना देखील बहुतांश ठिकाणी समितीचे उमेदवार जिंकणार अशी स्थिती बनली आहे.
नेत्यांचे सहकार्य मिळो अथवा न मिळो परंतु प्रत्येक गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून मध्यवर्ती आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी पोषक वातावरण तयार करण्यात आले आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीचीच सत्ता प्रत्येक ग्रामपंचायतीवर आणण्याचा निर्धारही केला.
सध्या सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकही आमदार नाही. सीमाभागात कोणतेही भक्कम नेतृत्व मराठी जनतेसाठी ठामपणे उभे नाही. जनतेची अनेक कामे हि जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून तालुक्यातील जनता करून घेत आहे. परंतु मराठी भाषिकांच्यावतीने खंबीरपणाने उभे राहून त्यांच्या हक्कांसाठी लढणारे एकही नेतृत्व सध्या सीमाभागात अस्तित्वात नाही. हि एकंदर परिस्थिती पाहून तालुक्यातील जनतेने स्वतः च जागरूक होण्याचे कार्य पार पाडले.
कार्यशील नेतृत्व नसूनही समितीचा लढा तालुक्यातील लोकांनी पुन्हा एकदा उभा केला. राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांनी उमेदवारांना पैसे वाटल्याचीही चर्चा आहे. एका जागेवर समितीच्या नावावर अनेक उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. परंतु त्यापैकी कोणताही उमेदवार निवडून आला तर तो समितीचाच असेल, यात शंका नाही. ३० डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात समितीचीच सत्ता प्रत्येक ग्रामपंचायतीवर येईल, अशी चर्चाही तालुक्यात रंगत आहे.
येत्या ३० डिसेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. समिती अस्तित्वातच नाही असा समज सध्या सीमाभागात रुजला आहे.
या ग्रामपंचायतींच्या निकालानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीवर समितीचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यावर याचा आदर्श घेऊन आगामी महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत समितीच्या माध्यमातून योग्य आणि खंबीर नेतृत्व निवडणूक रिंगणात उभे राहील, आणि बहुसंख्य मराठी मतांच्या जोरावर पुन्हा एकदा मराठी सत्ता स्थापन करेल, यात वाद नाही. तालुका महाराष्ट्र समितीने आपापसातील मतभेद आणि गट तट बाजूला सारून एकसंघ होण्याची गरज आहे.