येत्या ग्राम पंचायत निवडणूकीत मतदारांनी सामाजिक प्रश्नांची जाण असलेला निस्वार्थी आणि कर्तव्य दक्ष उमेदवारांनाच मतदान करावे, अशा आशयाचे जनजागृती पत्रक काढून गावात घरोघरी देण्याचा निर्णय कंग्राळी खुर्द येथील नवजागृती संघाने घेतला आहे.
कंग्राळी खुर्द (ता. बेळगांव) येथील मरगाई मंदिरात नवजागृती संघाच्या कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला. प्रारंभी सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी. डी. पाटील यानी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश सांगितला .
त्यानंतर सखोल चर्चेअंती आगामी ग्रा. पं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगल्या उमेदवाराच्या निवडीसाठी जनजागृती पत्रक काढून त्याचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सदर जनजागृती पत्रकात सर्वानी मतदानाचा हक्क जबाबदारीने बजावावा. कोणत्याही अमिषाला बळी पडू नये. सामाजिक प्रश्नोची जाण असलेला, शासकीय योजना गरजुंपर्यंत पोहचवणारा, परीपत्रकांची माहिती मराठीतून मिळण्यास आग्रह धरणारा, भ्रष्टाचारास थारा न देणारा, ग्रा.पं. सदस्यत्व म्हणजे समाज सेवेच व्रत आहे अशी भावना असणारा, समाजाला मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात अग्रेसर असणारा उमेदवाराला मतदान करावे अशा आशयाचा तपशील नमूद आहे. येत्या दोन दिवसात घरोघरी हे पत्रक वाटण्याचेही यावेळी ठरविणेत आले .
बैठकीत अनंत निलजकर, बी. डी. मोहनगेकर, दत्ता पाटील, गजानन पाटील, एस. व्ही. जाधव आणि चंद्रकांत पाटील यानी विविध मुद्दे सुचविले. याप्रसंगी नवजागृती संघाचे अर्जून पाटील, विवेक पाटील, दिनानाथ मुतगेकर, चंद्रकांत पाटील, टी.डी. पाटील आदी उपस्थित होते. पी. वाय. पाटील सरांनी सर्वांचे आभार मानले .