उचगांव ग्रामपंचायतीच्या आज झालेल्या निवडणुकीमध्ये बाळकृष्ण खाचू तेरसे आणि त्यांची पत्नी मथुरा बाळकृष्ण तेरसे हे जोडपे बहुमताने विजयी झाले आहे. यंदा या पद्धतीने एकाच वेळी ग्रामपंचायतीवर निवडून आलेले बेळगांव तालुक्यातील हे पहिलेच जोडपे आहे.
यंदा उचगांव ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 4 मधून बाळकृष्ण खाचू तेरसे अपक्ष उमेदवार निवडून आले असून त्यांनी आपल्या नजीकच्या प्रतिस्पर्ध्यावर 114 मतांनी विजय मिळविला आहे.
त्याप्रमाणे बाळकृष्ण यांच्या पत्नी मथुरा तेरसे यादेखील वॉर्ड क्रमांक 3 मधून निवडणूक लढवत होत्या. त्यांनीदेखील आपल्या पती प्रमाणे प्रतिस्पर्ध्यांवर 116 मतांचे मताधिक्य घेऊन विजय संपादन केला आहे. या पद्धतीने यावेळच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नवरा-बायको विजयी होण्याची बेळगांव तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.
मथुरा बाळकृष्ण तेरसे यांनी यापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे तालुका पंचायत निवडणूक लढवून ती जिंकली होती.
तालुका पंचायत सदस्यत्व भूषविलेल्या मथुरा यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तेरसे दाम्पत्याला सामाजिक कार्याची आवड असून उपरोक्त यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.