संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्या असून आता साऱ्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. बेळगाव जिल्ह्यातील ग्राम पंचायत निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली असून बेळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी बी. के. मॉडेल स्कुल येथे होणार आहे.
या मतमोजणी प्रक्रियेसाठी १२० टेबलचे, २२ वर्गखोल्या, ४२० कर्मचारी आणि इतर ११२ जण अशी व्यवस्था मतमोजणी केंद्रात करण्यात आली असून विभागवार मतमोजणी ३० डिसेंबर रोजी पार पडणार आहे. प्रत्येक गावकग्य मतमोजणीच्या वॉर्ड क्रमांक सांगून त्याठिकाणी मतमोजणी करण्यात येणार आहे.
मतमोजणी प्रक्रियेदरम्यान प्रशासनाने नियम घालून दिले असून यानुसार मतमोजणीसाठी ज्यांच्याकडे पास आहे, त्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. यासोबतच कोणत्याही प्रकारच्या कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. बी. के. मॉडेल शाळेतील वर्गखोल्यांमध्ये ही मतमोजणी होणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून केंद्रात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.
त्याशिवाय कोणालाही आत प्रवेश देण्यात येणार नाही. प्रत्येकाने मास्कचा वापर करणे सक्तीचे असून मास्क नसणाऱ्या व्यक्तींना माघारी पाठविण्यात येणार आहे. यासोबतच सॅनिटायझरचा वापर करणेही अनिवार्य आहे. मतमोजणी केंद्रावर उमेदवार आणि एजंटांनी एक तास आधी हजर राहावे, असे कळविण्यात आले आहे.