राज्यातील राजकारणात वादळी काम करणारे जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी गोकाकच्या विकासाचा विडा उचलला असून गोकाकचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी जारकीहोळी यांनी कंबर कसली आहे.
जारकीहोळी कुटुंबाने गोकाकसाठी काय केले? असा प्रश्न गोकाकमधील जनता उपस्थित करत होती. गोकाकमध्ये जारकीहोळींचीच सत्ता आहे. परंतु जारकीहोळींनी गोकाकसाठी काय केले? या प्रश्नाला आता ठोस कृतीतून उत्तर देण्याचे रमेश जारकीहोळी यांनी ठरविले आहे. गोकाक तालुक्यात येणारी हिडकल डॅम, गोकाक फॉल्स, गोडचिनमलकी हि तिन्ही पर्यटन क्षेत्रं एकमेकांपासून साधारण ३० किलोमीटर अंतरावर आहेत. या तिन्ही पर्यटन क्षेत्रांचा विकास करण्याची योजना रमेश जारकीहोळी यांनी आखली आहे.
या विकास कामांतर्गत गोकाक फॉल्स जवळ केवळ २० मीटर अंतरावर अमेरिका पॅटर्नवर आधारित काचेच्या पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. सुमारे ३५० कोटी रुपयांच्या खर्चातून या क्षेत्राचा विकास करण्याची योजना जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आखली आहे. या कामकाजाला लवकरच सुरवात करण्यात येणार आहे.
गोकाक शहरातील रस्ते रुंदीकरणासह अनेक विकास कामे हाती घेण्यात येणार असून गोकाक शहराला नवा लूक देण्याचा मानस रमेश जारकीहोळी यांनी जनतेसमोर व्यक्त केला आहे. गोकाक फॉल्सवर काचेचा सेतू, वोटर स्पोर्ट बोटिंग, आणि मोठ्या प्रमाणात पाणी साचवून हरिद्वार धर्तीवर गंगा पूजन व्यवस्था, तसेच गोकाक येथील हिडकल डॅम आणि गोडचिनमल्की या पर्यटन क्षेत्रांचा विकास आणि कायापालट पर्यटकांच्या राहण्याची व्यवस्था करण्याची योजनाही जारकीहोळी यांनी आखली आहे.