शहरातील ज्येष्ठ नागरिक आणि सुप्रसिद्ध फुटबॉल व हॉकी प्रशिक्षक 74 वर्षीय गोपाळ खांडे हे फुटबॉल आणि हॉकी खेळाची आवड असलेल्या लहान मुलांना खासकरून गरीब कुटुंबातील मुलांना गेल्या सुमारे 25 वर्षापासून मोफत प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या यंदाच्या 41 दिवसांच्या विनामूल्य फुटबॉल प्रशिक्षण शिबिराची मंगळवारी यशस्वी सांगता झाली.
गोपाळ खांडे हे माजी सैनिक असून त्यांना त्यांच्या लहानपणापासूनच हॉकी आणि फुटबॉल या खेळाची आवड आहे. लष्करात ड्राफ्ट्समन (ग्रेड वन) म्हणून काम करत असताना त्यांच्या लक्षात आले की बऱ्याच लहान मुलांना फुटबॉल किंवा हॉकी शिकण्यात रस आहे परंतु त्यांच्या पालकांना त्यामध्ये रस नाही अथवा त्यांना ते खेळ परवडणारे नाहीत. तेंव्हा खांडे यांनी मुलांना विनामूल्य फुटबॉल आणि हॉकीचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि अल्पावधीत त्यांच्या प्रशिक्षण शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळू लागला.
गोपाळ खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले अनेक हॉकी आणि फुटबॉल खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये चमकले आहेत. 1982 मध्ये “मोहब्लू क्लब” हा बेळगांवातील पहिला फुटबॉल क्लब स्थापण्यात खांडे यांचा पुढाकार होता. यासंदर्भात माहिती देताना गोपाळ खाडे म्हणाले की, बेळगांव शहरात 1975 साली “डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रॉफी” ही पहिली फुटबॉल स्पर्धा आयोजित केली गेली. मोहब्बत क्लबची स्थापना झाल्यानंतर जेंव्हा मी मोफत प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन सुरू केले. तेंव्हा मला शांताप्पा नरगोडी (62) आणि एम. बहादुर या दोन माजी सैनिकांचे सर्वतोपरी सहकार्य लाभले असे आवर्जून सांगताना बहादूर याचे दुर्दैवाने दोन वर्षांपूर्वी निधन झाल्याचे खांडे यांनी स्पष्ट केले.
सध्या गोपाळ खांडे हे बेळगांवातील सर्वात जुने आणि अत्यंत ख्यातनाम फुटबॉल व हॉकी प्रशिक्षक आहेत. अत्यंत कडक शिस्तीचे आणि तितकेच प्रेमळ असणारे गोपाळ खांडे प्रशिक्षणार्थींना खेळाच्या प्रत्येक खाचाखोचा सांगून त्यांना घडविण्याचे कार्य करतात. खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली सिद्धी अंगडी ही नुकतीच एसएसएलसी उत्तीर्ण झालेली हॉकीपटू चार वेळा राज्यस्तरीय आणि दोन वेळा राष्ट्रीय पातळीवरील हॉकी स्पर्धा खेळली आहे. राज्यस्तरीय स्पर्धांपर्यंत मजल मारलेल्या त्यांच्या शिष्यांमध्ये मृणालिनी भट, निशा गवळी, सृष्टी कोरडे, सारा शिंदे आदींचा समावेश आहे.
सध्या गोपाळ खांडे यांच्याकडे 38 हून अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून यापैकी बहुतांश विद्यार्थी हे गरिबी रेषेखालील कुटुंबातील आहेत. बऱ्याचदा खांडे स्वखर्चाने या मुलांना दूध आणि बिस्कीट याचा खुराक देत असतात. गोपाळ खांडे यांची एकच इच्छा असते की प्रशिक्षणार्थी मुलांमध्ये या दोन खेळांबद्दल अधिक रस निर्माण व्हावा आणि त्यांनी उच्चस्तरीय व्यावसायिक स्पर्धांपर्यंत मजल मारावी. सध्या मोहब्लू क्लबमध्ये सुमारे 20 संघांची अधिकृत नोंदणी आहे. नंदू बागी हे मोहब्लू क्लबचे अध्यक्ष असून खांडे उपाध्यक्ष आहेत. काल मंगळवारी मोफत प्रशिक्षण शिबिराच्या सांगता समारंभप्रसंगी बागी यांनी सर्व प्रशिक्षणार्थी मुलांना टी-शर्ट चे वाटप केले.