बेळगांवच्या रती हुलजी या युवतीने यंदाचा “फेमिना मिस कर्नाटक” हा प्रतिष्ठेचा किताब पटकावताना बेळगांवच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. फेमिना मिस कर्नाटक मुकुट जिंकणाऱ्या रती हुलजी हिची आता फेब्रुवारी 2021 मध्ये होणाऱ्या “फेमिना मिस इंडिया” स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
बेळगांवात लहानाची मोठी झालेली रती हुलजी बॅचलर ऑफ मासमीडियाचे शिक्षण घेण्यासाठी कांही वर्षापूर्वी मुंबईला गेली. मुंबई येथे असणारी रती तेथे मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक ॲड फिल्म्समधून तिने मॉडेलिंग क्षेत्रात पाय रोवले आहेत. यापूर्वी अनेक मॉडेलिंग स्पर्धांमध्ये तिने यशही मिळविले आहे.
फेमिना मिस कर्नाटक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या पांच स्पर्धकांमध्ये तिचा समावेश होता. काल झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये रती हुलजी हिने विजेतेपदाचा मुकुट हस्तगत करून फेमिना मिस इंडिया स्पर्धेसाठीचे आपले स्थान बळकट केले आहे.
पुढील महिन्यात प्रशिक्षण कालावधी असून 31 पैकी 15 स्पर्धकांची फेमिना मिस इंडिया स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर येत्या फेब्रुवारी महिन्यात या स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे.
रती हुलजी ही गणेशपूर येथील शरद काचोजी हुलजी व टिळकवाडी येथील सीमा उमेश भटकळ यांची कन्या आहे. उपरोक्त यशाबद्दल रतीचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.