Friday, November 29, 2024

/

भारत बंद साठी बेळगावातील शेतकरी सज्ज

 belgaum

शेतकरी विरोधी कायदे अंमलात आणून देशातील शेतकऱ्यांना संपविण्याच्या केंद्र सरकारच्या षडयंत्राच्या निषेधार्थ आणि संबंधित अन्यायी कायदे तात्काळ रद्द करावेत, या मागणीसाठी उद्या मंगळवार दि. 8 डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या “भारत बंद”ला पाठिंबा देण्यासाठी बेळगांव जिल्ह्यातील शेतकरी व कामगार संघटनांतर्फे उद्या छेडण्यात येणारे आंदोलन कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग न करता शांततापूर्ण मार्गाने यशस्वी करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

शहरातील आंबेडकर उद्यानामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या शामियानामध्ये बेळगांव जिल्हा रयत संघटनेसह बेळगांव शहर आणि तालुक्यातील रयत संघटना आणि हरित सेनेच्या शाखा, तसेच विविध कामगार संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांच्या आज सोमवारी सकाळी पार पडलेल्या बृहत बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला. सदर बैठकीत उद्याच्या देशव्यापी भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी बेळगांव येथे आयोजित आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आली.

त्याचप्रमाणे उद्याचे आंदोलन कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग न करता शांततापूर्ण मार्गाने यशस्वी करण्याचा निर्णय देखील एकमताने घेण्यात आला. शेतकरी संघटनांच्या जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शाखांचे किमान 500 कार्यकर्ते उद्या छेडण्यात येणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी झाले पाहिजे असे आवाहन बैठकीत करण्यात आले. त्याचप्रमाणे औषध दुकाने, दूध वितरण आणि वैद्यकीय सेवा यांना वगळून उद्याचा “भारत बंद” बेळगावात यशस्वी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीस संदर्भात अधिक माहिती देताना ज्येष्ठ कामगार नेते माजी महापौर ॲड. नागेश सातेरी म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगारांच्या विरोधात जे तीन अन्यायकारक कायदे ज्याला आम्ही “काळे कायदे” म्हणतो ते अंमलात आणले आहेत. त्याच्या विरोधात गेल्या दहा दिवसांपासून नवी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र केंद्र सरकार अद्याप सकारात्मक चर्चेला तयार नाही. त्यामुळे संबंधित तीनही कायदे जोपर्यंत रद्द केले जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार शेतकर्‍यांनी केला आहे. याला कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या फायद्याचे कायदे शेतकरी संघटनांना विश्वासात न घेता करण्यात आले आहेत, शिवाय कोरोना महामारीचे संकट असताना त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकार म्हणजे लोकशाही संपविण्याचे षडयंत्र आहे.Farmers meeting band

“माझ्या मनात जे येईल तेच मी करेन”, अशी जर देशाच्या पंतप्रधानांची मानसिकता असेल तर ती अत्यंत चुकीचे आहे. त्याला देशातील शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी कोणीही कदापि मान्यता देणार नाहीत असे सांगून उद्या मंगळवारी सकाळी 6 वाजता आम्ही कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथे थांबून नागरिकांना आमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन करणार आहोत. कारण देशातील शेतकऱ्यांना पाठिंबा देणे म्हणजे सर्वसामान्य जनतेला पाठिंबा दिल्यासारखे होईल हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे, असे ॲड. नागेश सातेरी यांनी स्पष्ट केले

शेतकरी व कामगार नेत्यांकडून पाठिंब्यासाठी जाहीर आवाहन करण्यात आल्यानंतर भारत बंद निमित्त उद्या मंगळवारी सकाळी 11 वाजता कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथून कॉलेज रोड मार्गे शहरातून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह करण्यात येईल. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले जाईल. दरम्यान शेतकऱ्यांची आतापर्यंतची सर्व आंदोलने शांततापूर्ण मार्गाने झाले आहेत, तेंव्हा उद्याचे आंदोलन देखील त्याच पद्धतीने शांततापूर्ण वातावरणात झाले पाहिजे.

परगावाहून बेळगांवातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची वाहने पोलिसांकडून घडवली जाण्याची शक्यता आहे. मात्र असे घडल्यास नाराज न होता संबंधित शेतकऱ्यांनी ते जेथे असतील त्या ठिकाणी निदर्शने करून बेळगांवातील आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवावा, असे आवाहनही उपरोक्त बैठकीप्रसंगी करण्यात आलेे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.