नेतेमंडळी येती गावा तोची दिवाळी -दसरा” याची प्रचिती काल मध्यरात्री बेळगावाकरांना आली, जेंव्हा एअर प्रेशर पंपद्वारे धर्मवीर संभाजी चौक येथील रस्त्यावरील धूळ -माती हटविण्यात आली.
स्मार्ट सिटी योजनेच्या नांवाखाली सध्या बेळगाव शहराची जी दुरावस्था झाली आहे ती सर्वांना ज्ञातच आहे. साधा एखादा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यासाठी बेळगांवकरांना सध्या आंदोलने हाती घ्यावी लागत आहेत.
वारंवार तक्रार करून देखील जनतेला आवश्यक मूलभूत नागरी सोयी सुविधा पुरविण्याकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे. शहरातील रस्त्यांची अर्धवट अवस्थेतील कामे आणि एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतरच एखाद्या रस्त्याचे विकास काम तात्काळ पूर्ण केले पाहिजे अशी बुद्धी ज्या प्रशासनाला सुचते
त्या प्रशासनाकडून अचानक काल शुक्रवारी रात्री 11.30 नंतर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या धर्मवीर संभाजी चौकातील रस्त्यावरील साधी धुळ -माती हटविण्यासाठी महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना कामाला लावण्यात आले होते. शहरातील अर्धवट अवस्थेतील विकासकामे पूर्ण करण्यात जो उत्साह दाखवावयास हवा होता तो काल मध्यरात्री रस्ते सफाईच्या कामात दाखविला जात होता. यामुळे सुज्ञ नागरिकांमध्ये सखेद आश्चर्य व्यक्त होत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आज शनिवारी राज्य भाजपच्या कोर कमिटीची आणि कार्यकारिणीची बैठक बेळगावात होणार असल्यामुळे परगावाहून येणाऱ्या मंत्रिमहोदयांना बेळगांवचे रस्ते किती सुंदर आहेत हे दाखवण्यासाठी हा खटाटोप करण्यात आला असल्याचे समजते. कारण जे कांही असो परंतु आज सकाळी नेहमीप्रमाणे संभाजी चौक परिसरात वावरणाऱ्या नागरिकांमध्ये मात्र रस्ता धूळ रहित स्वच्छ झाल्यामुळे समाधान व्यक्त होताना दिसत होते.