केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधातील आपले नवे कृषी कायदे तात्काळ रद्द करावेत अशी मागणी करणारे तसेच नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविणारे पंतप्रधानांच्या नांवे असलेले निवेदन बेळगांव जिल्हा भारतीय कृषक समाजासह अन्य विविध संघटनांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
बेळगांव जिल्हा भारतीय कृषक समाजासह अन्य विविध संघटनांतर्फे कामगार नेते माजी महापौर ॲड. नागेश सातेरी व कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिदगौडा मोदगी यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी सादर करण्यात आलेल्या निवेदनाचा जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी स्वीकार केला. तसेच उपस्थित नेते मंडळींचे म्हणणे ऐकून घेऊन निवेदन तात्काळ पंतप्रधान कार्यालयाकडे धाडण्याचे आश्वासन दिले.
केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे अंमलात आणून देशातील शेतकऱ्यांना संपविण्याचा प्रयत्न सुरू केल्याच्या आरोपाबरोबरच शेतकऱ्यांसाठी विघातक असलेले संबंधित अन्यायी कायदे तात्काळ रद्द करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यासंदर्भात बेळगांव लाईव्ह समोर प्रतिक्रिया व्यक्त करताना कामगार नेते माजी महापौर ॲड. नागेश सातेरी म्हणाले, देशातील तीनही नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात असून कॉर्पोरेट कंपन्यांच्या हितार्थ केलेले आहेत. या तीनही कायद्यांमुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागणार आहे. त्याचप्रमाणे महागाई प्रचंड प्रमाणात वाढणार असून साठेबाजीला ऊत येणार आहे.
या कायद्यांची अंमलबजावणी झाल्यास शेतकऱ्यांना स्वतःच्या मालकीच्या जमिनीतच शेतमजूर म्हणून काम करण्याची वेळ येईल असे सांगून अशा या अन्यायी कायद्यांच्या विरोधात आणि यासंदर्भात नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही भारतीय कृषक समाजासह विविध कामगार, शेतकरी तसेच सामाजिक संघटनांतर्फे जिल्हाधिकार यांना आज निवेदन सादर केले आहे, असे ॲड. सातेरी यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी भारतीय कृषक समाज बेळगांव जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा-पंतप्रधानाकडे बेळगावातील विविध संघटनांची मागणी
https://www.facebook.com/375504746140458/posts/1283644208659836/