कपिलेश्वर रोडवरील रेल्वे फ्लाय ओव्हर ब्रिज येथील रेल्वे मार्गाच्या दुतर्फा संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे. यामुळे दोन्ही बाजूच्या लोकांचा वहिवाटीचा कपिलेश्वर रोड हा रस्ता बंद होणार असल्यामुळे ही भिंत बांधताना नागरिकांना ये-जा करण्यासाठी जागा मोकळी ठेवावी, अशी जोरदार मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
रेल्वे विभागाकडून कपलेश्वर रोडवरील रेल्वे फ्लाय ओव्हर ब्रिज खालील रेल्वे मार्गाच्या दुतर्फा संरक्षक भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे मार्गाच्या दुतर्फा वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांमध्ये खळबळ उडवून आज शनिवारी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. सदर भिंतीमुळे रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या लोकांना रेल्वेमार्ग ओलांडून दुसऱ्या बाजूला जाणे कठीण होणार असल्यामुळे नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत होती. कारण या भिंतीमुळे रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या बाजूला जावयाचे असल्यास त्यांना ओव्हर ब्रिजवरून भोवाडा घालून जावे लागणार असून ते अत्यंत त्रासदायक ठरणार आहे. याआधी रस्ता असल्यामुळे बाजारात ये -जा करणे, महिलांना मुलांना घेऊन जाणे आणि वयोवृद्ध लोकांना रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या बाजूला जाणे सुलभ जात होते. आता बांधण्यात येत असलेल्या भिंतीमुळे नागरिकांच्या या वहिवाटीवर निर्बंध येऊन त्यांची कुचंबणा होणार आहे.
कपलेश्वर रोड हा मुख्य रस्ता शहापूर -बेळगांवसाठी लिंक रोड होता. सर्वांसाठीच विशेष करून वयस्कर लोकांसाठी ये -जा करण्यास हा मार्ग अत्यंत सोयीचा होता. शिवाय आता फ्लाईओव्हरमुळे तर वयोवृद्धांसाठी हा सर्व्हिस रोड झालेला कपिलेश्वर रोड म्हणजे जणू वरदानच ठरला आहे. यामुळे त्यांना जास्त त्रास न घेता इकडून तिकडे जाता येते होते. हा रस्ता जर आता भिंत बांधून बंद केला तर रेल्वे मार्गाच्या दुतर्फा राहणाऱ्या लोकांनी रेल्वे मार्ग कसा ओलांडायचा? असा सवाल स्थानिक रहिवासी अभिनंदन परमार यांनी केला आहे. तसेच लोकांना वहिवाटीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देऊनच भिंतीचे बांधकाम केले जावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कपिलेश्वर रोड बंद केल्यास नागरिकांना रेल्वे फ्लाय ओव्हर ब्रिजवरून मोठा वळसा घालून जावे लागणार आहे. तेंव्हा रेल्वे मार्गाच्या दुतर्फा संरक्षक भिंत बांधताना दोन व्यक्तींना किमान पायी ये-जा करता यावी इतकी वाट उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी तांगडी गल्ली, भांदुर गल्ली, रामा मेस्त्री अड्डा, कपिलेश्वर रोड आणि तहसीलदार गल्ली येथील नागरिकांनी केली आहे.