बेळगावमध्ये भाजप कोर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहणार आहेत. बेळगाव दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे सांबरा विमानतळावर आगमन होताच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज्य भाजपमधील विविध गोष्टींवर चर्चा करण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग हे बेळगावमध्ये दाखल होणार आहेत. आज गोव्याहून ते बेळगावमध्ये येणार असून बेळगावमध्ये आयोजित कोर कमिटीच्या बैठकीत ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा मुक्काम शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस बेळगाव येथे असून राज्यातील आगामी निवडणुकीत भाजपच्या भूमिकेबाबत ते चर्चा आणि मार्गदर्शन करणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आगामी काळात ग्रामपंचायत, लोकसभा, महानगरपालिका, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणूका होणार आहेत. या निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडणूक आणण्यासंदर्भात तसेच निवडणुकीची रूपरेषा ठरविण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती बी. एस. येडियुरप्पा यांनी दिली.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संपूर्ण राज्यात चर्चा सुरु असून यासंबंधी रविवारी निर्णय घेण्यात येणार का? असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांनी विचारला असता, याबाबतीत हायकमांडकडून कोणता आदेश आला आहे, याची माहिती आज अरुण सिंग यांच्याकडून घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनासंबंधी तसेच मराठा विकास प्राधिकरणाच्या स्थापनेविरोधात ५ डिसेंबर रोजी विविध कन्नड संघटनांनी पुकारलेल्या बंदबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी मौन पाळले.
आज बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कोर कमिटीच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा होईल? बहुचर्चित असलेला लोकसभा उमेदवाराचा मुद्दा स्पष्ट होईल का? या प्रश्नांच्या उत्तरांसाठी भाजप कार्यकर्ते प्रतीक्षेत आहेत.