धारवाड जि. पं. सदस्य योगेशगौडा खून प्रकरणातील आरोपी कर्नाटकचे माजी मंत्री व काँग्रेस नेते विनय कुलकर्णी यांची कारागृहात राजेशाही बडदास्त ठेवली जात आहे. या आरोपाची शहानिशा करण्यासाठी राज्य कारागृह खात्याचे डीआयजी एम. सोमशेखर यांनी शुक्रवारी हिंडलगा कारागृहाला भेट देऊन पाहणी केली.
सदर भेटीप्रसंगी डीआयजी एम सोमशेखर यांनी हिंडलगा कारागृहाचे अधीक्षक कृष्णकुमार व इतर अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन चर्चा केली. योगेशगौडा खून प्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या माजी मंत्री विनय कुलकर्णी यांना हिंडलगा कारागृहामध्ये स्थानबद्धतेत ठेवण्यात आले आहे. त्यांना कारागृहामध्ये सर्व सुखसोई पुरवल्या जात असल्याचा आरोप कांही प्रसारमाध्यमांकडून केला जात होता. त्याची शहानिशा करण्यासाठी कारागृह खात्याच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून हिंडलगा कारागृहाची तपासणी करण्यात आली.
या तपासणीअंती कारागृह अधीक्षक कृष्णकुमार यांनी स्पष्टीकरण देताना विनायक कुलकर्णी यांना कारागृहाचेच जेवण दिले जात आहे. त्यांना घरातून अंथरूण देखील पुरवण्यात येत नाही. यासंदर्भातील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांना घरातून आलेले कपडे व त्यांची औषधे देण्यास मुभा आहे. इतर कोणत्याही सुविधा त्यांना दिल्या जात नाही, असे कृष्णकुमार यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात डीआयजी सोमशेखर यांनी प्रत्येक गोष्टीची शहानिशा केली. तसेच कैद्यांना बाहेरून जेवण वगैरे पुरविले जाऊ नये. कोरोना संदर्भातील नियमांचे उल्लंघन होता कामा नये. कैद्यांना नातेवाईकांना भेटण्यास सध्या निर्बंध असून कोणालाही भेटू न देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याचे काटेकोर पालन होण्याची गरज असल्याचे डीआयजी सोमशेखर यांनी सांगितले.