अटक करण्यात आलेल्या चोराकडून आणखी दुचाकी जप्त
गेल्या दहा दिवसांपूर्वी शहर आणि परिसरातील दुचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या चोराला अटक करण्यात आली होती. यादरम्यान या आरोपीकडून सात दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. अधिक तपासादरम्यान या आरोपीने आणखी सात दुचाकी चोरल्याची कबुली दिल्यानंतर ही वाहने त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आली आहेत .
दीपक देमाणी लोहार (वय 22, मुळचा रा. लक्ष्मी गल्ली, संतीबस्तवाड, सध्या रा. रामनगर, कंग्राळी खुर्द) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 9 डिसेंबर 2020 रोजी या आरोपीलाअटक करुन त्याच्याकडील 7 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अधिक तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीनुसार या आरोपीकडून आणखी 7 दुचाकी टिळकवाडी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यामुळे एकूण जप्त केलेल्या वाहनांची संख्या 14 वर पोहोचली आहे.
19 नोव्हेंबर रोजी स्वामी विवेकानंद कॉलनी येथून KA 22 HE 5884 क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाली होती. या प्रकरणी 21 नोव्हेंबर रोजी मोनेश तिळवी (रा. देवराज अर्स कॉलनी, बसवणकुडची) यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी दीपक लोहार या युवकाला अटक करुन त्याची कसून चौकशी केली असता त्याने बेळगाव शहर व उपनगरांत अनेक ठिकाणी दुचाकी चोरल्याची कबुली दिली होती. त्याच्या जवळून एकूण 14 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा, गुन्हे तपास विभागाचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर, पोलीस उपनिरीक्षक एम. वाय. कारीमनी, पोलीस उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी, हवालदार के. के. सवदत्ती, सैय्यद गुडारद, एस. एम. कळ्ळीमनी, एस. ए. सावकार, मल्लिकार्जुन पात्रोट, मारुती मरनिंगगोळ, टी. जी. सुळकोड आदींनी ही कारवाई केली आहे.