एअरोनॉटिकल्स इंजिनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या बेळगावमधील विद्यार्थ्यांनी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून विमान तयार केले आहे. खऱ्याखुऱ्या विमानाप्रमाणे ५ फुटांचे विमान बनविण्यात आले असून आपल्या ज्ञानाचा लॉकडाऊन काळात या विद्यार्थ्यांनी पुरेपूर वापर केला असून या विमानाची चर्चा बेळगाव परिसरात जोरदार सुरु आहे. तर अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनियर (एएसएमई) या अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या संस्थेने आयोजित केलेल्या परिषदेमध्ये एका विद्यार्थ्याने रिसर्च पेपर सादर करून या विद्यार्थ्यांनी बेळगावच्या शैक्षणिक क्षेत्राचे नाव उंचावले आहे.
गणपत गल्ली येथील बाळेश हलगी, कंग्राळ गल्ली येथील शुभम गौंडाडकर यांनी हे विमान तयार केले असून अशाचप्रकारे रोहिन लेंगडे या विद्यार्थ्यानेदेखील रिसर्च पेपर सादर केला आहे. अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनियर (एएसएमई) या अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या संस्थेने आयोजित केलेल्या परिषदेमध्ये बेळगांवच्या रोहिन लेंगडे याने सादर केलेल्या रिसर्च पेपरची “उत्कृष्ट रिसर्च पेपर” म्हणून निवड झाली असून सोसायटीच्या नियतकालिकांमध्ये त्याचा हा रिसर्च पेपर लवकरच प्रकाशित होणार आहे.
विमान तयार केलेले बाळेश हलगी आणि शुभम गौंडाडकर हे दोघेही जीआयटी कॉलेजचे विद्यार्थी असून लॉकडाऊन काळात घरी उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून त्यांनी विमान तयार केले आहे. इंजिनियरिंगचे शिक्षण घेताना आपण घेतलेल्या शिक्षणाचा वापर व्हावा, या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम राबविला आहे. तयार करण्यात आलेल्या विमानात प्लास्टिकचे पाईप, स्पेचे कॅन, टाकाऊ फोम, घड्याळातील मशीन, खेळण्यातील जेसीबीचा रिमोट, मिक्सर जार यासह अनेक टाकाऊ वस्तूंचा वापर करण्यात आला आहे.
रिसर्च पेपर सादर करणारा रोहिन लेंगडे हा कॅम्प येथील सेंट पॉल हायस्कूलचा विद्यार्थी असून सध्या तो जीआयटी काॅलेजमध्ये मेकॅनिकल विभागात शिक्षण घेत आहे. एएसएमई ही अमेरिकेतील प्रतिष्ठित संस्था विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी कार्यरत असून अलीकडेच भारतातही या संस्थेचे आगमन झाले आहे. जीआयटीमध्ये एएसएमई स्कूल कार्यरत असून रोहिन त्याचा सदस्य आहे. ही सोसायटी आपले सर्व उपक्रम ईमेलद्वारे सदस्यांना पाठवत असते. त्यातूनच रोहनला पोर्टलंड येथे होणाऱ्या परिषदेबाबत माहिती मिळाली. त्यानंतर रोहिनने टोपोलॉजी ऑप्टिमायझेशन वापरून रॉकेट इंजिन कसे डिझाईन (एरोस्पाईक) करता येते, यावर संशोधनपर रिसर्च पेपर ऑनलाईन पाठविला. दोन टप्प्यात या रिसर्च पेपरची चांचणी होते.
रोहिन लेंगडे याची या क्षेत्रातील आवड लक्षात घेऊन कॅनडा येथील युनिव्हर्सिटी ऑफ गुएल्फने त्याला आपल्या विद्यापीठात इंटर्नशिप करण्यासाठी निमंत्रित केले आहे. ही इंटर्नशीप विद्यापीठाने स्वतः पुरस्कृत केली आहे. त्यामुळे रोहिन लवकरच कॅनडाला रवाना होणार आहे. रोहिन हा शिल्पा व शशांक लेंगडे यांचा सुपुत्र तर प्रभा व उद्योजक प्रेमचंद लेंगडे यांचा नातू आहे. विशेष म्हणजे प्रेमचंद लेंगडे हे अमेरिकेत असताना एएसएमईचे सदस्य होते. बेळगावमधील विद्यार्थ्यांनी अत्युच्च पातळीवरील केलेल्या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.