बेळगावमधील प्रवाशांसाठी पुन्हा एकदा सांबरा विमानतळावर नवी सेवा रुजू होत असून घोडावत समुहाच्या स्टार एअर कंपनीने बेळगाव ते सुरत ही विमानसेवा सुरू केली आहे. या विमानसेवेचा शुभारंभ सोमवारी (दि. 21) करण्यात आला. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या उपस्थितीत सांबरा विमानतळावर याचा शुभारंभ उडान 3 या योजनेतून करण्यात आला.
स्टार एअरचे हे विमान आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार रोजी सेवेसाठी उपलब्ध असणार आहे. सांबरा विमानतळावरून हे विमान दुपारी 12 वाजता सूरतसाठी उड्डाण भरणार असून सुरतहुन बेळगाव विमानतळावर सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी पोहोचणार आहे
स्टार एअर इंडियाच्या या कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याहस्ते दीप प्रज्वलनाने झाली. सांबरा विमानतळाचे संचालक राजेश कुमार मौर्य, घोडावत समूहाचे मुख्य व्यवसाय व्यवस्थापक राज हेसी, व्यवस्थापक कोमल जानी आणि विक्री व्यवस्थापक शशिकला आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रथम प्रवाशाला बोर्डिंग पास सोपविण्यात आला. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी आणि मान्यवर निमंत्रित बहुसंख्येने उपस्थित होते.