चोर-पोलिसांचा खेळ आपल्या सर्वांना माहित आहे. परंतु हाच खेळ अगदी जशाचा तसा आणि अगदी चित्रपटात किंवा टीव्हीवर पहावा इतका मनोरंजनात्मक आणि नाट्यमय खेळ बेळगावमध्ये रंगला होता. या खेळाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. परंतु हा खेळ नसून एका अट्टल चोराला नागरिक आणि पोलिसांच्या माध्यमातून पकडण्याचा आहे.
बेळगावमधील झाडशहापूर येथे चोरी करणारी दोघा अट्टल चोरांना पकडण्यासाठी येथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी जाळे रचले.
चाकू आणि जांबियाचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या या चोरांचा पाठलाग नागरिक आणि पोलिसांनी केला. एका शेतवाडीत घुसलेल्या या चोरांना पोलिसी खाक्या आणि नागरिकांची जागरूकता चांगलीच पहायला मिळाली. शेतवाडीत पळून जाऊन पुन्हा पोलिसांनाच दरडावणाऱ्या या चोरांना नागरिकांनी चांगलच इंगा दाखविला. या दोघांनाही अत्यंत शिताफीने नागरिकांनी आणि पोलिसांनी पकडले आहे.
बेळगावच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील ही घटना आज सायंकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या दोन चोरांचा पाठलाग करतानाचा व्हिडीओ एकाने काढला असून, चोर पळाल्यापासून ते चोरांना पकडण्यापर्यंत मोबाईलमध्ये कैद करण्यात आला आहे.
झाडशहापूर येथील मल्लप्पा गोरल यांच्या घरी चोरी करताना या चोरांना पकडण्यात आले आहे. चाकूचा आणि जांबियाचा धाक दाखवून दहशत पसरविण्याची या दोघाही चोरांची योजना पोलीस आणि नागरिकांनी मोडकळीस आणून या दोघांनाही चांगलाच इंगा दाखविला आहे. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.