लोकसभा पोटनिवडणुकीसाठी बेळगावमधील खासदारपदाच्या उमेदवारावर काँग्रेसने शिक्कामोर्तब केले असून या निवडणुकीसाठी आपले नाव फायनल करण्यात आले आहे, अशी माहिती केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी दिली आहे. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत आली आहेत. परंतु बंगळूरमध्ये माझ्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शुक्रवारी बेळगावमधील आरटीओ जवळ असलेल्या काँग्रेस कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हि माहिती दिली आहे. बंगळूरमध्ये केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली आहे. संबंधित ८ विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांसहित माजी खासदार एम. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून यासंबंधी फेरविचार करण्यासाठी बेळगावमध्येच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ही बैठक बंगळूर मध्ये घेणे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेस पक्षाचे जि. पं. सदस्य कृष्णा अनगोळकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे, अशी बातमी सर्वत्र पसरली आहे. परंतु त्यांनी अजूनही भाजपमध्ये प्रवेश घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा पंचायतीचा कार्यकाल अजून ६ महिने आहे. परंतु जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी २२ जि. पं. सदस्य आपल्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा आता संबंध काय? सध्या लोकसभा पोटनिवडणूक होणार आहेत. परंतु पालकमंत्र्यांच्या या विधानाचा येथे संबंध काय? असा प्रश्न त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर उपस्थित केला. शिवाय अशा गोष्टींना आपण महत्व देत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
परिवहन कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संप बाबतीत बोलताना ते म्हणाले, यासंदर्भात संपूर्ण माहिती मला माहित नाही. परिवहन मंत्री आहेत, सरकार आहे. परिवहन कर्मचारी आणि सरकारने समक्ष बसून चर्चा करून हा प्रश्न सोडवावा असे त्यांनी सांगितले. अनेक वर्षांपासून परिवहन कर्मचारी ही मागणी करत आहेत. अशा अनेक मागण्या करण्यात येत आहेत. सरकारने या समस्यांवर लक्ष देऊन या समस्या सामोपचाराने सोडवाव्यात, असा सल्ला त्यांनी दिला.