शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी बालकामगारांच्या माध्यमातून कामकाज केले जात असून, याची पडताळणी करण्यासाठी आज शहर परिसरात ठिकठिकाणी कामगार विभागाच्यावतीने धडक मोहीम हाती घेण्यात आली होती.
शहरातील नेहरू नगर परिसरात नुकतेच एका बालकामगाराचा मृत्यू झाला होता. बांधकामाच्या ठिकाणी असलेली कम्पाउंडची भिंत कोसळून एका बालकामगाराचा मृत्यू झाला होता. यानंतर शहरात अनेक ठिकाणी काम करत असलेल्या बालकामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी मागणी करण्यात येत होती. या अनुषंगाने आज कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने शहरातील अनेक ठिकाणी धडक मोहिमेअंतर्गत बालकामगार असलेल्या ठिकाणी तपासणी करण्यात आली.
शहर परिसरातील दुकाने, हॉटेल्स, बार आणि रेस्टोरंटससारख्या अनेक ठिकाणी अनपेक्षितरित्या भेट देऊन तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान शहरातील अनेक आस्थापनांमध्ये बालकामगारीविरोधात भित्तीपत्रके लावून जनजागृती करण्यात आली.
तसेच व्यावसायिकांना बालकामगार कामावर ठेवण्याविरोधात सक्त ताकीद देण्यात आली. या कारवाई दरम्यान विविध ठिकाणी ३ बालकामगार निदर्शनास आले. या बालकामगारांना कामाच्या ठिकाणाहून परत पाठविण्यात आले असून त्यांना बालभवन येथे घेऊन जाण्यात आले आहे.
या कारवाईत कामगार अधिकारी श्रीमती तरन्नुम बेंगाली आणि ए. जी. बाळीगट्टी यांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे वरिष्ठ कामगार निरीक्षक, बालसहाय्यवाणीचे कर्मचारी, पोलीस विभाग तसेच शिक्षण विभागाचे कर्मचारी, बाल कामगार योजना संचालक, चाईल्ड लाईन कर्मचारी हजर होते.