भाजप कोअर कमिटीच्या आणि कार्यकारिणीच्या बैठकीसाठी बेळगांवात राज्यातील नेतेमंडळींचे आगमन झाले आहे. मात्र या अतिमहनीय व्यक्तींसाठी प्रमुख मार्गावरील रहदारी रोखून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच रस्ता का रोखून धरला? असे विचारणाऱ्या नागरिकांना पोलिस “हा प्रश्न येडियुरप्पाना जाऊन विचारा”, असे उर्मट उत्तर देत असल्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
राज्य भाजप कोअर कमिटी आणि भाजप कार्यकारिणीची बैठक आज शनिवारी बेळगावात होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महनीय नेतेमंडळींचे बेळगावात आगमन झाले असून त्यांची वर्दळ सुरू झाली आहे.
या महनीय व्यक्तींची ये-जा सुरू झाल्यामुळे कॉलेज रोड, क्लब रोड, सिव्हील हॉस्पिटल रोड, काकतीवेस मार्ग हे कित्तूर चन्नम्मा सर्कलला जोडणारे रस्ते आज सकाळी बॅरिकेड्स घालून रोखून धरण्यात आले होते. या पद्धतीने पूर्वसूचना न देता रहदारी पोलिसांनी अचानक रस्ते रोखल्यामुळे संबंधित रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली.
सकाळची वेळ असल्यामुळे बहुतांश नागरिकांना कामावर हजर राहण्याची घाई असते. त्याप्रमाणे लोकांची सकाळच्या वेळी अनेक निकडीची कामे असतात. या घाईगडबडीच्या वेळेत सकाळी अचानक रस्ते अडविण्यात आल्यामुळे वाहतुकीची कोंडी तर झाली शिवाय वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
वैतागलेल्या वाहनचालकांनी अचानक असे रस्ते रोखून का धरले? असाच जाब संबंधित रहदारी पोलिसांना विचारला. यावरून वाहन चालक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक खडाजंगी उडाल्याची घटना कित्तूर चन्नम्मा सर्कलनजीक घडली. उद्दाम वर्तन करणाऱ्या त्या रहदारी पोलिसाने जाब विचारणाऱ्या वाहनचालकांना “रस्ता का अडवण्यात आला आहे ते जाऊन येडियुरप्पा यांना विचारा” असे अरेरावीचे उत्तर दिल्यामुळे उपस्थित सर्व वाहनचालक अवाक झाले.
महनीय व्यक्तिंचे आगमन होत असल्यामुळे खबरदारी म्हणून राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल परिसरातील रस्ते आज सकाळी रोखून धरण्यात आले असले तरी यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला. नेतेमंडळी जे कोणी असतील ते शेवटी लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी प्रथम लोकांचे हित पाहिले पाहिजे. परंतु आज सकाळी ज्या पद्धतीने त्यांच्यामुळे जनतेला मनस्ताप झाला त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.