जुना धारवाड रोड येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या व्यापारी संकुल संकुलातील 15 दुकानांचे गाळे लिलावाद्वारे भाडेकरारावर देण्याचा निर्णय आज पार पडलेल्या बेळगांव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणे ओल्ड ग्रँट बंगल्यामधील अतिक्रमण हटविण्याच्या विषयावर चर्चा होऊन या प्रक्रियेत आपण सहभागी होणार नसल्याचे सर्व सदस्यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले.
बेळगांव कॅन्टोन्मेंट बोर्डाची मासिक सर्वसाधारण बैठक आज मंगळवारी सकाळी बोर्डाच्या सभागृहामध्ये पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी रोहित चौधरी हे होते. त्याचप्रमाणे बेळगांव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके आणि राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्यासह बोर्डाचे सर्व सदस्य बैठकीला उपस्थित होते. ई -छावणी ऑनलाईन मॅनेजमेंट ऑफ कॅन्टोन्मेंट बोर्डतर्फे ऑनलाईन लायसनसिंगची सुरू झाले आहे. व्यापार क्षेत्रासाठी असणाऱ्या या पेपरलेस सुविधेद्वारे दुकानदारांना अवघ्या सहा दिवसात दुकानाचे लायसन्स ऑनलाईन उपलब्ध होणार आहे असे बैठकीत सांगण्यात आले. तसेच त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
जुना धारवाड रोड येथील कॅंटोन्मेंट बोर्डाच्या व्यापारी संकुलातील 15 दुकान गाळ्यांच्या भाडेकराराची मुदत येत्या 31 डिसेंबर रोजी संपणार आहे. भाडेकराराची मुदत वाढवून देण्यासाठी संकुलातील व्यापाऱ्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाला पत्र दिले आहे. यासंदर्भात बैठकीत चर्चा होऊन भाडेकराराची मुदत वाढून देण्याऐवजी लिलावाद्वारे दुकान गाळे भाडेकरारावर देण्याचा निर्णय बैठकीत एकमताने घेण्यात आला.
कॅन्टोनमेंट ॲक्ट 2006 च्या तरतुदीनुसार अतिक्रमणे हटविण्यात यावीत. अतिक्रमण केल्याप्रकरणी कॅन्टोन्मेंट हद्दीतील ओल्ड ग्रँट बंगलेधारकांकडून दंड वसूल करण्यात यावा, असा आदेश दिल्ली येथील डीजीडीई कार्यालयातून एका पत्राद्वारे बजावण्यात आला आहे.
यावर आजच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली. यावेळी बोर्डाचे सदस्य साजिद शेख यांनी ओल्ड ग्रँट बंगल्यांमधील नवे आवश्यक बांधकाम कसे चुकीच्या पद्धतीने अनधिकृत ठरविण्यात येत आहे याची माहिती दिली. शेख यांनी दिलेल्या माहितीची गांभीर्याने दखल घेऊन अध्यक्ष ब्रिगेडियर चौधरी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी बर्चस्वा यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या तसेच चुकीच्या पद्धतीने कार्यवाही केली जाऊ नये असे सांगितले. यावेळी कॅन्टोन्मेंट हद्दीतील ओल्ड ग्रँट बंगल्यांचे सर्वेक्षण करण्यास आमची कोणतीही हरकत नाही. मात्र अतिक्रमण हटविण्यास मात्र आमचा विरोध आहे, असे उपस्थित सदस्यांनी यावेळी एकमताने नमूद केले.
सदर बैठकीत किल्ला येथील पूर्वी कॅंटोनमेंटच्या ताब्यात असलेला आणि आता लष्कराच्या मालकीचा रामघाट रोड, केंद्रीय विद्यालयामागील जीएलआर सर्व्हे नं. 99 मधील खुली जागा आणि या ठिकाणी बांधण्यात येणारे लष्कराचे स्टेशन हेडक्वाटर आदी विषयांवर चर्चा झाली.
बैठकीस कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा निरंजना अष्टेकर, सदस्य साजिद शेख, विक्रम पुरोहित, अल्लाउद्दीन किल्लेदार, श्रीमती अरेबिया धारवाडकर, रिझवान बेपारी आदींसह सरकार नियुक्त सदस्य आणि बोर्डाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.