Sunday, December 1, 2024

/

भारत बंद”ला बेळगांव शहर परिसरात संमिश्र प्रतिसाद

 belgaum

केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांच्या विरोधातील कायद्याच्या निषेधार्थ देशभरात पुकारण्यात आलेल्या “भारत बंद”ला आज मंगळवारी बेळगांव शहर परिसरात अत्यंत संमिश्र प्रतिसाद मिळाला.

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे अंमलात आणून देशातील शेतकऱ्यांना संपविण्याचा प्रयत्न सुरू केल्याच्या निषेधार्थ आणि शेतकऱ्यांसाठी विघातक असलेले संबंधित अन्यायी कायदे तात्काळ रद्द करावेत, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या “भारत बंद”ला आज मंगळवारी बेळगांव शहर परिसरात अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला. बेळगांव जिल्ह्यातील शेतकरी व कामगार संघटनांनी आज सकाळी तीव्र आंदोलन छेडल्यामुळे नाही म्हणता बेळगांव मध्यवर्ती बस स्थानक आणि कित्तूर चन्नम्मा सर्कल परिसरातील दुकाने अल्पकाळ बंद ठेवण्यात आली होती, अन्यथा आज बंदच्या कालावधीत ठराविक दुकाने वगळता शहरातील सर्व दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू होते.

सर्वसामान्यांना त्रास होऊ नये म्हणून आजचा भारत बंद अवघ्या 4 तासाचा ठेवण्यात आला होता. यासाठी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी हा भारत बंद जनतेने आपापले व्यवहार बंद ठेवून यशस्वी करावा, असे आवाहन स्थानिक शेतकरी व कामगार संघटनांतर्फे करण्यात आले होते. तथापि या आवाहनाला शहरवासीयांनी गांभीर्याने न घेता अवघे 4 तास देखील आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवले नसल्याचे दिसून आले.Belgaum band protest

आज सकाळी शेतकरी संघटनांकडून एकीकडे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन छेडले जात असताना दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी असलेल्या बेळगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये म्हणजे एपीएमसी मार्केट यार्डमध्ये देखील “भारत बंद”चा म्हणावा तसा प्रभाव जाणवला नाही. एपीएमसी मार्केट यार्डमधील बरेचसे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होते. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी शहरात आवश्यक ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

“भारत बंद”ला एपीएमसी मार्केट यार्डात संमिश्र प्रतिसाद

केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्याच्या निषेधार्थ आज मंगळवारी देशव्यापी “भारत बंद”ची हाक देण्यात आली आहे. बेळगांव जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी देखील या बंदला पाठिंबा व्यक्त करून सकाळपासूनच आंदोलन छेडले असले तरी बेळगांव एपीएमसी मार्केट यार्डात मात्र भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

शेतकरी विरोधी कायदे अंमलात आणून देशातील शेतकऱ्यांना संपविण्याच्या केंद्र सरकारच्या षडयंत्राच्या निषेधार्थ आणि संबंधित अन्यायी कायदे तात्काळ रद्द करावेत, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या “भारत बंद”ला पाठिंबा देण्यासाठी आज मंगळवारी बेळगांव जिल्ह्यातील शेतकरी व कामगार संघटनांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. एकीकडे हे आंदोलन छेडले जात असताना दुसरीकडे बेळगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये म्हणजे एपीएमसी मार्केट यार्डमध्ये “भारत बंद”चा म्हणावा तसा प्रभाव जाणवत नव्हता. शेतकऱ्यांची निकटचा संबंध असणाऱ्या बेळगांव एपीएमसी मार्केट यार्डमधील बरेचसे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होते. मालाच्या खरेदी-विक्री बरोबरच त्याची ने-आण होताना दिसत होती.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.