केएसआरपी कॉन्स्टेबल आणि आयआरबी नेमणुकीसाठी 22 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान चार डमी उमेदवारांना अटक केल्या प्रकरणातील मास्टर माईंड मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली असून दोघांचा शोध अद्याप जारी आहे.
लक्ष्मण परवण्णावर (रा. गोकाक) असे मुख्य संशयित आरोपीचे नांव असून बेंगलोर येथील बसवणगुडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याचप्रमाणे हॉल तिकीट व इतर कागदपत्रे तयार करणारा मास्टरमाइंड बसवराज गुंड्यागोळ (रा.बिरनगड्डी, गोकाक) याचा शोध घेण्यात येत आहे. कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल व आयआरबी नेमणुकीसाठी गेल्या 22 नोव्हेंबर रोजी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेदरम्यान बेळगांव शहरातील चार परीक्षा केंद्रांवर 4 डमी उमेदवारांना अटक करण्यात आली होती.
लक्ष्मण परवण्णावर याने विविध सरकारी खात्यांमध्ये रिक्त असणाऱ्या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये डमी उमेदवार बसून लाखो रुपये उकळले असल्याची माहिती पोलिस चौकशीत समोर आली आहे. बेळगांव परिसरात अनेक जणांकडून त्याने परीक्षेला बसण्यासाठी पैसे दिले आहेत. यातून त्याने मोठी माया जमविली आहे. सीईटीतील अटक करण्यात आलेल्या डमी उमेदवार भिमाप्पा महादेव हुल्लोळी (वय 24, रा. हडिगनाळ, ता. बैलहोंगल) याला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता लक्ष्मण परवण्णावर व बसवराज गुंड्यागोळ यांची नावे पुढे आली. बसवराज गुंड्यागोळ उमेदवारांना परीक्षेसाठी तयार करत त्यांच्या नांवे हॉल तिकीट तयार करून देत असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. त्याच्यावर बेळगांव शहरात तसेच बेंगलोर, चित्रदुर्ग आदी पोलिस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.