काकती (ता. बेळगांव) येथील ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान केंद्राची स्थापना गावातील प्राण्यांच्या दवाखान्यामध्ये करण्यात आल्यामुळे पशूप्रेमींमध्ये तीव्र नापसंती व्यक्त होत होती.
पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान आज मंगळवारी पार पडले. या निवडणुकीसाठी काकती येथील प्राण्यांच्या दवाखान्यामध्ये मतदान केंद्र उभारण्यात आले होते. परिणामी आजारी आणि अपघातग्रस्त प्राण्यांवर उपचार करण्यात अडथळा निर्माण झाला होता.
निवडणुकीच्या मतदानासाठी खरेतर गावातील एखादी शाळा अथवा अन्य सरकारी जागेचा वापर करावयास हवा होता. तथापि तसे न करता प्राण्यांच्या दवाखान्यामध्ये मतदान केंद्र उभारण्यात आल्यामुळे आपल्या घरातील प्राण्यांवर तसेच अपघातग्रस्त प्राण्यांवर उपचार करू इच्छिणाऱ्या नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी गैरसोय झाली होती.
काकतीनजीक आज एका मुक जनावराचा रस्त्यावर अपघात झाला होता. तेंव्हा त्याला दवाखान्यात हलविणे गरजेचे होत, परंतु दवाखान्यात निवडणूक बूथ असल्यामुळे उपचार उपलब्ध झाले नाहीत.
यावेळी कांही वैद्यकीय तज्ञांनी आणि पशुप्रेमींनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धोका पत्करून त्या जनावराचा जीव वाचविला. तसेच प्राण्यांच्या दवाखान्यात निवडणूक प्रक्रिया राबविल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.