भाग्यनगर येथे बसखाली सापडून एका विद्यार्थ्यांचा बळी गेल्यानंतर उमटू लागलेल्या संतप्त प्रतिक्रिया आणि प्रसार माध्यमांनी उठविलेली टीकेची झोड यामुळे खडबडून जाग्या झालेल्या जिल्हा प्रशासन व बेळगांव स्मार्ट सिटी लिमिटेडने अनगोळ मुख्य रस्त्याचे काम युद्धपातळीवर द्रुतगतीने पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे.
बेळगांव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत अनगोळ मुख्य रस्त्याचे काम जवळपास एक वर्षापासून सुरू आहे. अनगोळ मुख्य रस्त्याच्या कामाला सुरुवातीपासूनच ग्रहण लागले होते. चांगल्या असलेल्या या रस्त्याचे स्वरूप अर्धवट खोदाई काम करून बिघडवण्यात आले होते. अनेक ठिकाणी पाण्याच्या पाईप व ड्रेनेज चेंबर फुटले होते. दुर्दशा झालेल्या रस्त्यामुळे दररोज लहान-मोठे अपघात घडत होते. अत्यंत संथ गतीने सुरू असलेले या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जावे, अशी वारंवार मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात होते.
रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे अनगोळच्या बसेस भाग्यनगरमधून वळविण्यात आल्या होत्या. मात्र दोन दिवसापूर्वी तनय हुईलगोळ या विद्यार्थ्याचा बसखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे अनगोळ मुख्य रस्त्याच्या कामासंदर्भातील अनगोळ व भाग्यनगर परिसरातील नागरिकांचा संताप पुन्हा उफाळून आला. प्रसारमाध्यमांनी देखील टीकेची झोड उठविली. परिणामी प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
तनय हुईलगोळ या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी बळी गेल्यानंतर कंत्राटदार आणि स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दुसऱ्याच दिवशी अनगोळ मुख्य रस्त्याच्या कामाला सुरुवात केली.
सध्या दिवस-रात्र हे काम सुरू असले तरी हेच काम पूर्वी केले असते तर त्या विद्यार्थ्यांचा जीव वाचला असता अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. सध्या घाईगडबडीत काम सुरू असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असली तरी रस्त्याचे काम लवकर पूर्ण होणार याचेच समाधान नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.