व्हिजनफ्लाय बेळगांव या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्यावतीने आयोजित केलेले परस्पर संवाद सत्र आज सोमवारी सकाळी यशस्वीरित्या पार पडले.
सदर परस्पर संवाद सत्राच्या कार्यक्रमात भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्यावतीने बेळगांव विमानतळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार मौर्य यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.
कोरोना संदर्भातील सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर आदी नियमांचे पालन करून आयोजित केलेल्या या या कार्यक्रमामध्ये व्हिजनफ्लाय बेळगांवच्या 100 हून अधिक विद्यार्थी -विद्यार्थिनींसह त्यांच्या शिक्षकवर्गाचा सहभाग होता.
या सर्व प्रतिभावंत विद्यार्थी -विद्यार्थिनींनी सुमारे 3 तास चाललेल्या परस्पर संवाद सत्रामध्ये उस्फुर्त सहभाग दर्शवून आपण विमानचालन उद्योग आणि आदरातिथ्य उद्योगातील भावी आव्हाने यशस्वीरित्या पेलण्यास सज्ज असल्याचे दाखवून दिले.
अत्यंत स्वारस्यपूर्ण रीतीने पार पडलेल्या या परस्पर संवाद सत्रामध्ये वेळेचे व्यवस्थापन, कोणत्याही संस्थेमधील संस्कृती मूल्य, विमानचालन उद्योगाचे भविष्य, उडान योजना आदिंसंदर्भात विद्यार्थ्यांनी प्रश्न आणि शंका विचारल्या.
राजेशकुमार मौर्य यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि शंकांचे निरसन करण्याबरोबरच त्यांना आवश्यक मार्गदर्शन करून विमानचालन आणि आदरातिथ्य उद्योगातील त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.