पोलीस वनविभागाच्या पथकाने गोकाक तालुक्यातील कुंदरगी क्रॉसनजीक वन्य पशू व पक्ष्यांची तस्करी करणाऱ्या तिघा जणांच्या टोळीला जेरबंद करून त्यांच्याकडील एक माकड आणि 14 तितर पक्षी जप्त केले.
भिमाप्पा निंगाप्पा टगरी (वय 45), भिमशाप्पा सत्याप्पा बडवगोळ (वय 35), परसाप्पा सत्याप्पा नंदी (वय 21, तिघेही रा. कनसगेरी, ता. गोकाक) अशी अटक केलेल्या तिघा जणांची नांवे आहेत. वन खात्याच्या पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी सदर कारवाई केली.
पाच जणांची एक टोळी जंगली प्राणी व पक्ष्यांची तस्करी करत असल्याची माहिती मिळताच सापळा रचून कुंदरगी क्रॉसनजीक तिघा जणांना अटक करण्यात आली. उर्वरित दोघेजण फरारी झाले आहेत. यल्लाप्पा निंगाप्पा टगरी आणि लक्ष्मप्पा फकिराप्पा नंदी (दोघेही रा. कणसगेरी) अशी फरारी आरोपींची नांवे आहेत.
फरारी आरोपींचा शोध जारी असून अटक केलेल्या तिघाजणांना गोकाक येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. रामदुर्ग येथील वन विभागाचे अधिकारी या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.