शहरातील समादेवी गल्लीतील भाजीविक्रेते तसेच फळविक्रेत्यांना वाहतूक कोंडीमुळे रहदारी पोलिसांनी हटविले होते. याविरोधात आज समादेवी गल्ली येथील भाजीविक्रेत्यांनी आणि फळविक्रेत्यांनी आंदोलन केले. पोलिसांनी केलेल्या कारवाईवर तीव्र संताप भाजीविक्रेत्यांनी या आंदोलनावेळी व्यक्त केला. यावेळी आमदार अनिल बेनके यांनी याठिकाणी भेट देऊन नियमानुसार भाजीविक्रीसाठी परवानगी देण्याचे आश्वासन दिले.
समादेवी गल्ली येथे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असल्यामुळे रहदारी पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून याठिकाणी भाजीविक्रेत्यांना निर्बंध घातले होते. वाहनांची वाढती संख्या आणि याचठिकाणी भाजी विक्री आणि खरेदीसाठी होत असलेल्या गर्दीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. या कारणास्तव रहदारी पोलिसांनी ही कारवाई केली होती. परंतु या कारवाईविरोधात येथील भाजीविक्रेत्यांनी आज तीव्र आंदोलन छेडले.
यावेळी येथील एका भाजीविक्रेत्या महिलेने सांगितले कि, दोन दिवसांपासून आम्हाला याठिकाणी भाजीविक्री करण्यापासून निर्बंध घातले आहेत. समादेवी गल्ली येथून कॅम्प परिसरात भाजीविक्रीसाठी सल्ला देण्यात येत आहे.
परंतु कॅम्प परिसरातही भाजीविक्रीसाठी निर्बंध घालण्यात आले असून आमचा उदरनिर्वाह कसा चालायचा असा प्रश्न या महिलेने उपस्थित केला. याठिकाणी नाही तर इतर कोणत्याही ठिकाणी पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी येथील भाजीविक्रेत्यांकडून करण्यात आली.
याठिकाणी आमदार अनिल बेनके यांनी तातडीने भेट दिली. पोलीस आणि भाजीविकेत्यांमध्ये समन्वय साधून भाजीविक्रेत्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत समादेवी गल्लीतच मार्किंग करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मार्किंग केल्यानंतर मार्किंग रेषेच्या आताच भाजी विक्री आणि खरेदी करण्याची सूचना आमदार अनिल बेनके यांनी दिली. रहदारीला कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही याची दक्षता घेऊन भाजीविक्रीसाठी परवानगी देण्यात येणार असल्याची सूचना त्यांनी भाजीविक्रेत्यांना केली.
यावेळी रहदारी पोलीस विभागाचे सीपीआय श्रीनिवास हंडा, भाजी विक्रेते संघाच्या अध्यक्षा संगीता खोत, प्रसाद कवळेकर, इमामहुसेन नदाफ, विजय चव्हाण, काशिनाथ मुचंडी आदी उपस्थित होते.