कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे राजकीय सचिव एन. आर. संतोष यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी झालेल्या या प्रकरणात एन. आर. संतोष यांनी झोपेच्या गोळ्यांचे अतिरिक्त सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे.
बेशुद्धावस्थेत असणाऱ्या एन. आर. संतोष यांना बंगळूरच्या एम. एस. रामय्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तात्काळ त्यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी रुग्णालयाला भेट देऊन डॉक्टरांशी संतोष यांच्या प्रकृतीविषयी विचारणा केली. दरम्यान संतोष यांच्या प्रकृतीविषयी कोणतेही चिंतेचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
एन. आर. संतोष यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नांमागचे नेमके कारण समजू शकले नाही. परंतु त्यांच्या कुटुंबियांशी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे. संतोष यांनी २८ मी रोजी राजकीय सचिवपदाची अधिकारसूत्रे स्वीकारली होती. त्यांनी नेमक्या कोणत्या कामासाठी आत्महत्येचा प्रयत्न केला याबाबत अद्याप ठोस माहिती उपलब्ध झाली नाही.