शहराची अवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली असून सर्वात अधिक समस्या रस्त्यांची झाली आहे. मागील तीन महिन्यांपासून शेट्टी गल्ली येथील मुख्य रस्त्यावर मधोमध मातीचा ढिगारा टाकण्यात आला असून यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
जुन्या पीबी रोडवर काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. यादरम्यान शेट्टी गल्लीच्या मुख्य प्रवेश रस्त्यावरच मातीचे आणि खादीचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. या रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक वाहनांना हा ढिगारा पार करून जाणे अवघड होत आहे. रिक्षा, चारचाकी वाहनांना तर दुसरा पर्यायच नाही. त्यामुळे या रस्त्याऐवजी चव्हाट गल्लीच्या रस्त्याचा वापर करावा लागत आहे. मागील तीन महिन्यांपासून हि डोकेदुखी नागरिकांना सतावत आहे.
महानगरपालिका अखत्यारीत येणाऱ्या या रस्त्यावरील हा ढिगारा त्वरित उचलण्याची मागणी येथील स्थानिक करत आहेत. दुचाकीस्वार अतिरिक्त वेढा टाळण्यासाठी या ढिगाऱ्यातून कसरत करून मार्गस्थ होत आहेत.
पादचारीही कसरत करून हा ढिगारा पार करत आहेत. या गल्लीत राहणाऱ्या रहिवाशांना दुसऱ्या गल्लीतून मार्गस्थ होण्याची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे दररोज नोकरी-व्यवसायासाठी बाहेर जाणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसत आहे.
संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी हे मातीचे ढिगारे त्वरित उचलून रास्ता मोकळा करून द्यावा, तसेच याठिकाणी टाकण्यात आलेला खडीचा ढीगही हटविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.